वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा दौऱ्यानिमित्त अभूतपूर्व सुरक्षा तयारी करण्यात आली आहे. २० सप्टेंबर, शुक्रवारी पंतप्रधान मोदी हे विश्वकर्मा मेळाव्यास संबोधित करणार आहेत. येथील स्वावलंबी मैदानावर त्यांचा कार्यक्रम होत असून याठिकाणी जाणारे मार्ग २०० मिटर अंतरावर बंद करण्यात आले आहे. तसेच पार्किंग, वाहतूक, नो हाकर्स झोन या माध्यमातून शहरी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. याचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

सार्वजनिक ठिकाणी रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी ही पावले उचलण्यात आल्याचे नमूद आहे. २० तारखेस सर्व जड वाहनांना सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत शहरात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. व्हीआयपी वाहणासाठी स्वावलंबी डि एडचे मैदान, शीतला माता मैदान व सर्कस ग्राउंड आरक्षित आहे.

हेही वाचा – म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांचे अर्ज करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! अर्ज भरण्यासाठीची मुदत १२ तासांनी वाढवली

बसेससाठी सायन्स कॉलेज व कोचर ग्राउंड, दुचाकी वाहणासाठी अग्निहोत्री कॉलेज, पोलीस वाहने रामनगर पोलीस ठाणे तसेच तुकडोजी शाळा मैदान, न्यू इंग्लिश शाळा मैदान शासकीय वाहने यासाठी राखीव आहेत. बजाज ते शास्त्री चौक पुतळा ते बॅचलर रोड हा शहरातील मुख्य मार्ग इतर वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील नागरिकांची कोंडी होण्याची शक्यता आहे. गांधी पुतळा, रेस्ट हाऊस, धुनिवाले मठ, न्यू आर्ट्स कॉलेज, आर्वी नाका हा वाहतुकीच्या सोयीचा समजला जाणारा मार्ग आहे. तो २० तारखेस बंद ठेवण्यात आला आहे. किमान सभा संपेपर्यंत तरी नागरिक वाहने घेऊन घराबाहेर पडू शकणार नाहीत.

हेही वाचा – मुंबई :डॉ. अजित रानडे उच्च न्यायालयात, नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाची सोमवारपर्यंत अंमलबजावणी न करण्याचे आदेश

२० सप्टेंबरला सभेच्या दिवशी वर्धा शहरातील सर्व शाळांना स्थानिक प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे. पंतप्रधान यांच्या दौऱ्यानिमित्त वर्धा शहरात प्रचंड गर्दी व वर्दळ राहणार आहे. त्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी शहरातील व शहरलगत असलेल्या सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २० तारखेस सुट्टी असल्याचे आदेशात नमूद आहे. शाळा सुरू राहिल्यास मुलांच्या बसेसची गर्दी वाढू शकते. तसेच या बसेस वाहतूक कोंडीत सापडू नये म्हणून ही काळजी घेण्यात आल्याचे ऐकायला मिळाले. सभास्थळ असलेल्या रामनगर परिसरातील प्रत्येक घराची तपासणी करण्यात आली असून या दोन दिवसांत घरी कोणालाही येण्यास मनाई करण्याची तोंडी सूचना झाली आहे.