अकोला : देहव्यापार सध्या खूप फोफावत चालला आहे. समाज माध्यमातून त्याला चालना मिळते. अकोल्यात समाज माध्यमाद्वारे देहव्यापार चालवला जात असल्याचा खळबळजनक प्रकार पोलीस कारवाईत उघडकीस आला आहे. तरुणींचे छायाचित्र समाज माध्यमांवर टाकून पुरुषांना आकर्षित करायचे, दोन ते पाच हजार रुपयात सौदा ठरवून दलाल महिला देहव्यापाराचा गोरखधंदा शहरातील कीर्ती नगर या उच्चभ्रू परिसरात चालवत होत्या. खदान पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या देहव्यापाराची खात्री करून छापा टाकला. या पोलीस कारवाईत देहव्यापाराचा पर्दाफाश झाला. या कारवाईत एक पुरुष व दोन महिला आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

खदान पोलीस ठाण्यांतर्गत गोरक्षण मार्गावरील किर्ती नगर येथे एका घरात काही युवक व युवती असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला. एका घरातून पाच महिला व पाच युवकांना ताब्यात घेतले. माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला होता. देहव्यापाराची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. ठाणेदार मनोज केदारे व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांना घरामध्ये युवक व युवती आक्षेपार्ह अवस्थेमध्ये दिसून आले. पोलिसांनी त्यांना विचारपूस केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी युवती व युवकांना खदान पोलिस ठाण्यात आणले. रात्री उशिरापर्यंत त्यांची कसून चौकशी सुरू होती. हा देहव्यापार किती दिवसांपासून सुरू आहे, या संदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत.

देह व्यापाऱ्याच्या प्रकरणात जयेश नरेश अग्रवाल (३२ रा. किर्ती नगर गोरक्षण रोड अकोला) या मुख्य आरोपीसह दोन महिला आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाच पुरुष ग्राहकांवरही कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, शहर पोलिस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पीएसआय दीपक पवित्रकार, दादाहरी वनवे, महिला पीएसआय मयुरी सावंत, अंमलदार निलेश खंडारे, अमित दुबे, विजय मुलनकर, दिनकर धुरंदर, रवी काटकर, अभिमन्यू सदाशिव, वैभव कस्तुरे, अर्चना बोदडे, सोनल गवई, धनश्री वाहुरवाघ, अंजूषा रत्नपारखी यांनी केली. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.