लोकसत्ता टीम

नागपूर : सध्या पोलिसांवर कामाचा तणाव वाढत असल्याची चर्चा असतानाच नागपुरातील सुराबर्डीतील एका पोलीस कर्मचाऱ्याने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली. मंगेश मस्की असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पोलीस कर्मचारी मंगेश मस्की हे राज्य राखिव पोलीस दलात अंमलदार पदावर कार्यरत होते. ते सध्या डेप्युटेशनवर सुराबर्डीत अपारंपरिक प्रशिक्षण केंद्रात (युओटीसी) कार्यरत होते. तेथे त्यांना गार्ड ड्युटीवर तैनात करण्यात आले होते. त्यांची पत्नीसुद्धा नागपूर पोलीस दलात असून वाडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांना दोन मुले असून ते पत्नीसह अपारंपरिक प्रशिक्षण केंद्रातील पोलीस क्वार्टरमध्ये राहत होते.

आणखी वाचा-लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा

मंगेशला दारुचे व्यसन होते. गेल्या काही दिवसांपासून तो तणावात वावरत होता. त्याने शनिवारी सायंकाळी पाच वाजता गार्डरुममध्ये कर्तव्यावर असताना एसएलआर बंदुकीने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. आवाज ऐकताच अन्य कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. मंगेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी लगेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. या प्रकरणी वाडी पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली. मंगेश यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. मस्की यांनी कामाच्या ताणातून आत्महत्या केली की दुसरे काही कारणातून, याचा तपास सुरू आहे.