अकोला : देशात पूर्वी गावांमध्ये उघड व शहरी भागात चार भिंतीच्या हात होणारा जातीय द्वेष, भेदभाव आता मुखवट्या बाहेर येऊन समाजात सर्वत्र पसरत आहे. सर्वोच्च संवैधानिक पदावरील व्यक्तीला लक्ष्य केल्या जाते. ही एक घटना नव्हे तर एक प्रकारे संदेश दिला आहे. दलित आयएएस, डॉक्टर, शासकीय अधिकाऱ्यांवर आता ती वेळ येणार आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वाेच्च न्यायालयात झालेल्या बूट हल्ला प्रकरणावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधतांना तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. जातीय द्वेष प्रचंड प्रमाणात वाढला असून ही धोक्याची घंटा असल्याचे ते म्हणाले.
जातीवर आधारित अत्याचार गावांमधील क्रूर वास्तविकता म्हणून पाहिल्या जात होते. त्या ठिकाणी जातीय व्यवस्था उघड आणि हिंसक पद्धतीने लागू केल्या जाते. शहरातील जातीयवाद व भेदभाव एक मूक मुखवटा घालून राहतो. कार्यालय, रुग्णालय आणि शासकीय कार्यालयातील चार भिंतीच्या आतमध्ये लपलेला. मात्र, आता तसे राहिले नाही, असे ॲड. आंबेडकर म्हणाले. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ला हे वास्तविकतेचे कटू सत्य असून जातीय द्वेष आता चार भिंतीच्या बाहेर आला आहे. जेव्हा देशातील सर्वोच्च संवैधानिक पदावरील व्यक्तीला जातीच्या आधारावर लक्ष्य केले जाऊ शकते, तर दलित आयएएय अधिकारी, डॉक्टर, सरकारी अधिकारी यांच्यासाठी याचा काय अर्थ आहे? असा प्रश्न ॲड. आंबेडकरांनी केला. आता पुढची वेळ दलित आयएएय अधिकारी, डॉक्टर, सरकारी अधिकारी यांची राहू शकते. ही केवळ घटना नव्हे तर हा एक संदेश असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बिहारमध्ये ‘इंडिया’ने दलितांना दूर ठेवले
बिहार निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीने दलित नेतृत्वाला दूर ठेवले आहे. त्यामुळे आगामी बिहार निवडणुकीत इंडिया आघाडीचे नुकसान होईल, अशी टीका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीने मूर्खपणा न करता वंचित बहुजन आघाडीला बाहेर ठेवले नसते तर भाजप केंद्रामध्ये सत्तेत नसती, असेही ते म्हणाले. देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सनातनवादाला प्रोत्साहित केले. त्यांची निष्ठा देशासाठी नव्हे तर सनातनासाठी आहे, अशी टीका देखील त्यांनी केली.