नागपूर : राज्य सरकारने दिल्ली येथील मे. रिन्यू पॉवर लि.शी सामंजस्य करार केला असून त्या माध्यमातून नागपुरात २० हजार कोटींची गुंतवणूक प्रस्तावित आहे. यातून सुमारे आठ ते दहा हजार तरुणांना रोजगार मिळणे अपेक्षित आहेे.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कराराप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि रिन्यू पॉवर प्रा. लि. यांच्यावतीने डॉ. अमित पैठणकर उपस्थित होते.

हेही वाचा – पुणे : वरिष्ठ पोलीस निरीक्षकाविरुद्ध महिला पोलिसांच्या तक्रारी… ‘असा’ दिला त्रास

मे. रिन्यू पॉवर ही कंपनी १० गिगावॅट मेटाल्युर्जिकल ग्रेड सिलिका, १० गिगावॅट पॉलिसिलिकॉन, ६ गिगावॅट इनगॉट/ वेफर निर्मिती सुविधा आणि १ गिगावॅट मॉड्युल निर्मितीची सुविधा नवीकरणीय ऊर्जा ब्लॉकसह एकात्मिक प्रकल्प स्थापित करणार आहे. हा प्रकल्प सुमारे ५०० एकर जागेवर होणार आहे.

प्रस्तावित प्रकल्पात वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे ८,००० ते १०,००० प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. प्रकल्प उभारल्यानंतर प्रकल्पाशी संबंधित पूरक उद्योगांच्या माध्यमातून २००० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. मे. रिन्यू पॉवर प्रा. लि. यांच्या वतीने समूह अध्यक्ष डॉ. अमित पैठणकर व राज्य शासनाच्या वतीने प्रधान सचिव उद्योग डॉ. हर्षदीप कांबळे यांनी करारावर स्वाक्षरी केली.

हेही वाचा – पुण्यात पावसाला सुरुवात; मोसमी पाऊस दाखल झाल्याची हवामान खात्याकडून घोषणेची शक्यता

“राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे. उद्योग वाढीसाठी पूरक वातावरण आहे. नविनीकरण (रिन्यूएबल) ऊर्जा क्षेत्रात उद्योग वाढीसाठी लागणारे सर्व सहकार्य करण्यात येईल.” – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.