नागपूर : शहरातील हुडकेश्वर परिसरात गेल्या १५ वर्षांपासून मानसोपचार तज्ज्ञ म्हणून उपचार करणाऱ्याने जवळपास शंभरावर मुली, तरुणी आणि विवाहित महिलांचे लैंगिक शोषण केले.त्यांच्या अश्लील चित्रफिती तयार करून त्यांना ‘ब्लॅकमेल’ करीत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मात्र, तीन पीडित मुली व महिलांनी त्या कथित मानसोपचार तज्ज्ञाविरुद्ध लेखी तक्रार दिली. हुडकेश्वर पोेलिसांनी त्याला अटक केली असून त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मानसोपचार तज्ज्ञ राजेश याने १५ वर्षांपूर्वी हुडकेश्वर येथे घरीच मानसोपचार उपचार करण्यासाठी क्लिनिक उघडले होते. तेव्हापासून तो अनेकांवर उपचार करीत होता. अनेकदा तो उपचाराच्या नावाखाली सहलीचे आयोजन करीत होता.

हेही वाचा…नागपूर : मकरसंक्रांतीला पतंगबहाद्दरांचा रस्त्यावर धिंगाणा! तब्बल १७ जण रुग्णालयात…

मात्र, विकृत वृत्तीच्या राजेशने उपचारासाठी येणाऱ्या अल्पवयीन मुली, विवाहित महिला आणि तरुणींशी अश्लील चाळे करायला सुरुवात केली. नैराश्यात असलेल्या पीडिता हा प्रकार सहन करीत होत्या. त्याने अनेक मुलींशी अश्लील चाळे करताना भ्रमणध्वनीद्वारे छायाचित्र आणि चित्रफिती काढल्या होत्या. तसेच काही महिलांशी क्लिनिकमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. तो सर्व प्रकार भ्रमणध्वनी लपवून ठेवून चित्रफिती काढत होता. त्यानंतर त्या मुली किंवा महिलांना चित्रफिती दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बाध्य करीत होता.

अनेकदा तो उपचाराच्या नावावर सहलीचे आयोजन करीत होता. यादरम्यान, हॉटेल किंवा फार्महाऊसवर पीडितांवर लैंगिक अत्याचार करीत होता. आतापर्यंत राजेशने अंदाजे शंभरपेक्षा जास्त मुली आणि महिलांचे लैंगिक शोषण केल्याची माहिती समोर आली आहे.

असा आला प्रकार उघडकीस

काही दिवसांपूर्वी एक महिला हुडकेश्वर पोलीस ठाण्यात पोहचली. ‘माझे काही अश्लील छायाचित्र फेसबुक आणि इंस्टाग्राम’वर प्रसारित होत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्यामुळे पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला. तर राजेश याचे नाव समोर आले. पीडित विवाहितेला विचारणा केली असता तिने सांगितले की, ‘मी अविवाहित असताना राजेशने माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून चोरून छायाचित्र काढले होते. तेच छायाचित्र दाखवून वारंवार शारीरिक संबंधाची मागणी करीत आहे.’ अशी तक्रार केली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

राजेशला अटक, पत्नी फरार

लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी कथित मानसोपचार तज्ज्ञ राजेशला अटक केली. त्याने मुली व महिलांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली दिली. त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. पतीवर गुन्हा दाखल होताच त्याची पत्नी फरार झाली. त्याची पत्नीसुद्धा त्याची विद्यार्थिनी होती. त्याने तिचेही लैंगिक शोषण केले होते. परंतु, बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याच्या भीतीपोटी त्याने लग्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पतीच्या या कूकृत्यात त्याच्या पत्नीचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा…नायलॉन मांजाचा फास, अकोल्यात गळा चिरून दुचाकी चालकाचा मृत्यू

संगणकात आढळल्या शेकडो अश्लील चित्रफिती

राजेशने आतापर्यंत अनेक मुली-महिलांचे लैंगिक शोषण केले. अश्लील चित्रफिती इंस्टाग्रामवर टाकण्याची धमकी देऊन तो आताही लैंगिक अत्याचार करीत होता. त्यामुळे अनेक मुली आणि महिला त्रस्त झाल्या होत्या. मात्र, अनेकींचे लग्न झाल्यामुळे संसार विस्कळीत होईल, या भीतीपोटी कुणीही त्याच्या विरुद्ध तक्रार करण्यास धजावत नव्हत्या. तो प्रत्येकवेळी भ्रमणध्वनीने अश्लील चित्रफिती काढत होता. पोलिसांनी जप्त केलेल्या त्याच्या संगणकात शेकडो अश्लील चित्रफिती आढळल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Psychiatrist sexually abused nearly hundred women in hudakeshwar area adk 83 sud 02