वर्धा : सर्वाधिक पसंतीचा प्रवास म्हणजे रेल्वे. सोयीचा व कमी खर्चाचा अशी चर्चा होणारा. पण त्यात आरक्षण मिळणे पण तेवढेच कठीण, हा सार्वत्रिक अनुभव. म्हणून नव्या गाड्या सोडण्याची नेहमी मागणी होते. वर्धा ते पूणे हा असाच व्यस्त मार्ग. संगणक उद्योगातील चाकरमानी, त्यांचे आप्त व अन्य असे पुण्यात रोज धाव घेत असतात. पण आरक्षण मिळत नाही म्हणून ओरड असते. काही तरी करा, असा तगादा नेहमी असतो. या अनुषंगाने वर्धा पुणे अशी व्हाया गाडी सूरू होणार. ती पण अद्यावत सुसज्ज कोच असणारी. रेल्वे मंडळाचे विशेष सदस्य प्रणव जोशी यांनी ही माहिती सांगितली.

वर्धा येथून पूणे जाण्यासाठी रिवा – गोंदिया – पूणे ही नवीन रेल्वे सेवा सूरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. वर्धा येथून दर बुधवारी सायंकाळी साडे सात वाजता निघणार व गुरुवारी सकाळी पावणे दहा वाजता पुणेत पोहचणार. पूणे येथून दर गुरुवारी दुपारी सव्वा तीन वाजता सुटणार व वर्ध्यात पहाटे साडे चार वाजता पोहचणार. या रेलमूळे वर्धा स्थानक सतना, कटणी, जबलपूर, नैनपूर, बालाघाट, गोंदिया सोबत जोडले जाणार आहे. दुसरी गाडी सेवाग्राम येथून बांगलुरू व ग्वाल्हेर या ठिकाणी जाण्यासाठी ग्वाल्हेर सेवाग्राम व बांगलुरु ही नवीन सेवा सूरू होणार. सेवाग्राम येथून बंगरुलु येथे जाण्यासाठी दर शनिवारी सकाळी सात वाजता ही गाडी नियोजित आहे. सेवाग्राम येथून ग्वाल्हेर येथे दर सोमवारी  दुपारी अडीच वाजता राहील. या नव्या सेवेमुळे मध्यप्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यातील अनेक रेल्वे स्थानक वर्धा जंक्शन सोबत जोडल्या जातील.

प्रणव जोशी म्हणतात की हे मार्ग वन्यजीव प्रेमी नागरिक यांना आनंद देणारा ठरणार. सतना, बांधवगड व पन्ना असे तीन व्याघ्र प्रकल्प या मार्गावर लागतात. एकाचवेळी तीन व्याघ्र प्रकल्प वर्धेकर व अन्य जिल्ह्यातील भारतीयांना अनुभवता येणार, हा मोठा आनंदच. तसेच पूणे गाडी ही सुपर फास्ट राहणार. म्हणजे वर्धा येथून ती सुसाट पळणार . भुसावळ व काही मोजकीच स्थानके त्यानंतर आहेत. २० कोचची गाडी सर्व श्रेणीसह आहे. दोन सामान्य डब्बे राहतील. हे कोच पण अत्याधुनिक असणार आहेत, असे प्रणव जोशी सांगतात.