नागपूर : एकीकडे मंगळवारी शहरात वादळी पाऊस सुरू होता. अनेक भागांत पाणी साचले होते. त्याच वेळी रात्री १२.३० च्या सुमारास पाचपावली पोलिसांचा फोन खणखणला आणि तेथून सुरू झाली तासाभराची बचाव मोहिम. लोकेशन शोधण्यासाठी पळापळ…. कारण होते व्हॉट्सअप वरून पत्नीला व्हिडिओ कॉल करीत आत्महत्या करणार असल्याचे सांगणाऱ्या लाईव्ह आत्महत्येच्या प्रयत्नाचे.
प्रसंगाचे गांभीर्य ओळखून कसलाही प्रश्न न विचारता भर पावसात पाचपावली पोलीस एक्शन मोडवर आले आणि तुफान पाऊस सूरू असताना बचाव मोहिम पूर्ण करीत या धाडसी पोलीसांनी जीव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्येष्ठाचे प्राण वाचविले. मध्यरात्री घडलेल्या या थरार नाट्यामुळे एका कुटुंबाला पोलीस दलातल्या माणूसकीचा सुखद अनुभव आला.
पाचपावली पोलीस ठाण्यापासून अवघ्या ५०० मिटर अंतरावरील एका जुन्या घरात हा थरार सुरू होता. बाहेर तुफान पाऊस सुरू असताना रात्री सव्वाबाराच्या सुमारास पोलीसांचा फोन खणणखला. आपले पती गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात आहेत. आजारपणामुळे जीवनाला कंटाळलो असून आपण आत्महत्या करणार असल्याचे या महिलेने पोलीसांना सांगितले. व्हिडीओ कॉल करून त्यांनी मला फॅनला लावलेला गळफासही दाखवल्याचे ही महिला फोनवरून पोलिसांना सांगत होती. पोलीस दलातील बीट मार्शल आनंद सिंग आणि राजू श्रीवास्तव यांनी तडक या महिलेकडे पत्ता विचारला. त्यावेळी महिलेने मुलाला संपर्क साधत पोलीसांशी बोलण्यास सांगतले. मुलाने घराचा पत्ता सांगत लोकेशन पाठवले. भर पावसात पोलीस कसलाही विचार न करता घटनास्थळी धावले. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. पोलीसांनी बळाचा वापर करीत दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तिथे सिलिंग फॅनसाठी लावलेल्या अँगलला गळफासाचा दोर पोलीसांना दिसला. घटनास्थळ गाठण्यास पोलीसांना एका मिनीटाचाही उशीर झाला असता तर कदाचित या ज्येष्ठाने प्राण गमावला असता.
यापूर्वी केले होते धाडस
पाचपावलीतल्या मोतीबागेत बालपण गेलेले आनंद सिंग हे लहानपणापासूनच खेळाडू वृत्तीचे आहेत. पोलीस दलाच्या फूटबॉल टीममधून त्यांनी अनेकदा नेत्रदिपक कामगिरी केली आहे. पोलीस दलात सामील झाल्यापासून त्यांनी जीवावर उदार होत अनेकदा धाडस केले आहे. यापूर्वी एकदा लष्करी बागेत एक माथेफिरू दगड घेऊन लोकांच्या अंगावर जात होता. त्याने काही जणांवर दगडफेकही केली होती. त्यावेळी आनंद सिंग यांनी धाडस करीत या माथेफीरूला आवर घातला होता.