नागपूर: शिवसेनेच्या बालेकिल्ला रामटेक मधून सलग दोन वेळा निवडून आलेले विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना ऐनवेळी पक्षाने तिकीट नाकारले. पक्ष फुटीनंतर तुमाने शिंदे गटात सोबत गेले होते. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. पण रामटेकची जागा आम्हाला मिळावी अशी आग्रही मागणी भाजपने केली. त्यामुळे शिंदे गटापुढे पेच निर्माण झाला. रामटेकची जागा वाचवण्याच्या प्रयत्नात शिंदे यांनी भाजपच्या आग्रहापोटी तुमाने यांना उमेदवारी नाकारून भाजपने दिलेल्या उमेदवाराला संधी दिली. या राजकीय घटना घडामोडींनंतर तुमाने नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. याबाबत त्यांच्यांशी संपर्क साधला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

खासदार तुमाने म्हणाले ” उमेदवारी नाकारल्याचं मला दुःख आहे. मला उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट झाल्याने कॉंग्रेसमध्ये आनंदाचं वातावरण आहे. असे असले तरी मी पक्षावर नाराज नाही. पक्षाने दिलेल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.”

हेही वाचा… बुलढाणा: ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेस जिल्हाध्यक्षासह ११ जणांवर गुन्हे दाखल

हेही वाचा… धक्कादायक! नागपूरात नऊ महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

रामटेक हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथून तुमाने दोन वेळा खासदार म्हणून निवडून गेले. २०१४ मध्ये कॉंग्रेस नेते मुकूल वासनिक यांचा तर २०१९ मध्ये कॉंग्रेसचे किशोर गजभिये यांना पराभूत केले होते. तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून विजयाची हॅटट्रिक करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी प्रचारही सुरू केली होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेकला भेट दिली होती. शिवसेना फुटीनंतर तुमाने यांनी शिंदेंची साथ दिल्याने व शिदेंसोबत आलेल्या सर्व विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले असल्याने तुमाने हेच रामटेकचे महायुतीचे उमेदवार असतील असेच शिवसैनिकांना वाटत होते. पण घडले भलतेच. त्यामुळे या निवडणुकीत तुमाने यांची भूमिका महत्वाची असणार आहे.