अनिल कांबळे
नागपूर : नुकताच गृहमंत्रालयाकडून राज्य पोलीस दलातील पोलीस अधीक्षक-उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. परंतु, या बदल्यामध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्यांवर गृहमंत्रालयाने अर्थकृपा केली तर ठराविक अधिकाऱ्यांना वारंवार साईड पोस्टींगला ठेवले. त्यामुळे या बदल्यानंतर राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांमध्ये खदखद असल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ७ नोव्हेंबरला राज्यातील पोलीस अधीक्षक-पोलीस उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी गृहमंत्रालयाने काढली. परंतु, या बदल्यामध्ये गृहमंत्रालयातून ठरविक अधिकाऱ्यांना अर्थपूर्ण हालचाली करून क्रिम पोस्टींग दिल्या. अनेक अधिकाऱ्यांना वारंवार कार्यकारी पदे मिळाली. काही अधिकाऱ्यांनी राजकीय संबंधाचा लाभ मिळवत जिल्ह्याचे नेतृत्व मिळवले. काही अधिकाऱ्यांची तर बदली झाल्यानंतर २४ तासांच्या अवधीतच आदेशात बदल करून मोठ्या पदावर नियुक्ती मिळवली.
अडगळीत असलेल्या पदावर वर्णी लागलेल्या अधिकाऱ्यांनीही बराच जोर लावून कार्यकारी पदासाठी मोर्चेबांधणी करण्यात यश मिळवले. परंतु, जे अधिकारी गृहमंत्रालयाची पायरी चढले नाही किंवा त्यांचे राजकीय संबंध नाहीत, अशा अधिकाऱ्यांना मात्र वारंवार साईड पोस्टींग देण्यात आली. अधीक्षक पदासाठी पात्र असतानाही नेतृत्वाच्या पदापासून दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांमध्ये पोस्टींगवरून खदखद असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा <<< “ती धडपडतेय उपचारासाठी, तिच्या बछड्यांसाठी पण…”, ताडोबातील वाघिणीची ह्रदयद्रावक कथा
कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी बदली
राज्यातील काही पोलीस पोलीस अधिकाऱ्यांची सार्वत्रिक बदल्यामध्ये जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदावर बदली झाली होती. अनेक काही अधिकाऱ्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करण्यात आली. अशा अधिकाऱ्यांना नेतृत्वपद काढून अडगळीतील पदावर नियुक्ती दिल्यामुळेसुद्धा पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
कनिष्ठ अधिकारी अजुनही प्रतीक्षेत
राज्यभरातील पोलीस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक आणि पोलीस निरीक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या रखडलेल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील पोलीस अधिकारी नाराज आहेत. पोलीस महासंचालकांच्या अख्त्यारीत असलेल्या बदल्यांनी विनाकारण विलंब केल्या जात आहे. कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यातही राजकारण होत असल्यामुळे राज्यातील कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये असंतोष आहे.