नागपूर : दुबईत लपून बसलेला आरटीई घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार शाहिद शरीफने नागपूर पोलिसांची दिशाभूल केली. त्याने जुन्या पारपत्राची कागदपत्रे पोलिसांच्या हाती मुद्दाम लागू दिली. त्यामुळे पोलीस त्याच्या पारपत्राची मुदत लवकरच संपण्याची वाट बघत बसले. मात्र, शाहिदने २०१८ मध्येच नव्याने पारपत्र काढले  होते आणि त्याची मुदत २०२८ पर्यंत आहे.  या  नव्या घडामोडीमुळे नागपूर पोलीससुद्धा गोंधळात पडले आहेत.

शाहिद शरीफने शिक्षण क्षेत्रातील जवळपास ५० टक्क्यांपेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या टोळीत सहभागी करून आरटीई घोटाळा केला होता. राज्यभर गाजलेल्या घोटाळ्याचा शाहिद हा मुख्य सूत्रधार आहे. शाहिदने लहान भाऊ राजा शरीफ, शाहिदची सहकारी रुपाली ऊर्फ रुखसार, राजेश बुवाडे आणि प्रशांत हेडाऊ यांच्या मदतीने आरटीई घोटाळा केला. त्याने अनेक श्रीमंतांच्या मुलाला आरटीई योजनेअंतर्गत प्रवेश मिळवून दिला. त्यासाठी तो पुण्यातील शिक्षण संचालकांच्या कार्यालयातून सूत्रे हलवित होता. हा घोटाळा उघडकीस येताच शाहिद शरीफ हा दुसऱ्याच दिवशी दुबईला पळून गेला होता. त्याने नागपूर पोलिसांना ‘मामा’ बनविण्यासाठी शाहिदने मुद्दामून आपला जुने पारपत्र पोलिसांच्या हाती लागू दिले. नागपूर पोलीस २३ जून पारपत्राची शेवटची तारीख असल्याने वाट ती संपण्याची बघत होते. मात्र, शाहिदने २०१८ मध्ये त्या पारपत्राचे नूतनीकरण केले होते. आता नवीन पारपत्राची मुदत २०२८ पर्यंत आहे. त्यामुळे शाहिद शरीफच्या अटकेची शक्यता जवळपास मावळली आहे. पारपत्र प्राधिकरणाने पोलिसांना चुकीची माहिती दिल्यामुळे हा घोळ झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा >>> नागपुरातील हिट अँड रन प्रकरण : आरोपीच्या पतीला न्यायालयाकडून पुन्हा दिलासा

नव्याने ‘एलओसी’ 

शाहिद शरीफबाबत नागपूर पोलिसांनी यापूर्वी ‘लूकआऊट सर्क्युलर’ (एलओसी) जारी केले होते. मात्र  पारपत्राचे नवे प्रकरण समोर आल्याने पोलिसांनी जुन्या एलओसीमध्ये सुधारणा केली आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांनी दिली.

हेही वाचा >>> नागपूर विमानतळावर ‘बॉम्ब ,’एका आठवड्यात दुसरा मेल, यंत्रणा सतर्क

शुभमने तोंड उघडले

शाहिद शरीफ याला बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्या शुभम चंद्रशेखर बुटे (२८, रा. हुडकेश्वर)  याने पोलीस कोठडीत ‘पाहुणचार’ मिळताच शाहिद विरुद्ध तोंड उघडले. त्याने शाहिदच्या सांगण्यावरून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आलेल्या पालकांची यादीच पोलिसांना दिली.  शुभमने बनावट उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, बनावट आधार कार्ड, रहिवाशी दाखले आणि अन्य कागदपत्रे तयार करून दिली. त्याला दोन दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती.