नागपूर : लवकरच जातनिहाय जनगणना होणार आहे. त्यात मराठा समाजातील बांधवांनी स्वतःला ओबीसी प्रवर्गात दाखवल्यास समता परिषदेकडून आक्षेप घेतला जाईल, अशी माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांनी दिली.नागपूरसह भंडारा, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद या संघटनेची सोमवारी रवी भवन येथे आढावा बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रपरिषदेत समीर भुजबळ पुढे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. परंतु ओबीसी समाजावर अन्याय होऊन आरक्षणावर गदा येता कामा नये. सध्या ओबीसी समाजाला केवळ २७ टक्के आरक्षण आहे. त्यातून व्हीजेएन.टी.सह इतर वर्ग वगळल्यास हे आरक्षण केवळ १९ टक्केच शिल्लक राहते.

मराठा समाजाला ईडब्लूएस माध्यमातून आणि आता नवीन पद्धतीने स्वतंत्र आरक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे त्यांना ओबीसी वर्गातून आरक्षणाची गरज नाही. दरम्यान मराठा समाजातील व्यक्तींनी आरक्षणासाठी स्वत:ला ओबीसी दाखवण्याचा प्रयत्न केल्यास ते कागदपत्र अभावी शक्य नाही. त्यांना ओबीसी असल्याचा पुरावे दाखवावा लागणार. त्यामुळे मराठा समाजाने स्वत:ला ओबीसी दाखवण्याचा प्रयत्न केल्यास ओबीसी समाजाचे आरक्षण वाढणार असून मराठ्यांना त्याचा लाभ होणार नाही. परंतु त्यानंतरही खोडसाळपणे कुणी मराठा समाजातील व्यक्ती स्वत:ला ओबीसी दाखवण्याचा प्रयत्न करत असल्यास त्यावर समता परीक्षेचे कार्यकर्ते आक्षेप घेतील. त्यानंतर संबंधित दोषी ओढळल्यास त्यावर कडक कारवाई शक्य असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. याप्रसंगी बापू भुजबळ, ईश्वर बाळबुधे आणि इतरही नेते उपस्थित होते.

जरांगे पाटील आंदोलनाची भूमिका तेच सांगतील…

जातनिहाय जनगणना अद्याप सुरू झाली नाही. ती सुरू होणार आहे. अद्याप या जनगणनेबाबतचा फाॅरमॅट कसा असेल तेही कुणाला माहित नाही. त्यामध्ये आम्हाला अपेक्षीत असलेल्या गोष्टी आहेत काय? तेही बघितले जाईल. जरांगे पाटील यांनी पुन्हा मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत भूमिका तेच मांडू शकतील. परंतु आमची भूमिका ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही आणि त्यांच्या आरक्षणावर गदा येता कामा नये अशी आहे. जरांगे पाटील यांची सरसकट मराठा समाजाला ओबीसी वर्गात टाकण्याची मागणी चुकीची आहे. ते शक्य नसल्याचेही समीर भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान होऊ घातलेली जातनिहाय जनगणना केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या जनगननेच्या पद्धतीनुसारच व्हायला हवी, असेही भुजबळ म्हणाले.