नागपूर : शासनस्तरावरील विविध जनकल्याणकारी योजनांच्या माहिती समवेत जे पात्र लाभार्थी ज्या योजनांचा लाभ घेतात त्याबाबतची माहिती गावातच लाभार्थ्यांना उपलब्ध व्हावी यासाठी आता प्रत्येक बुधवारी होणाऱ्या समाधान दिवशी मिळेल. विशेषत: संजय गांधी निराधार योजनेबाबत ज्यांना त्यांच्या बँक खात्यामार्फत लाभ दिल्या जातो त्या बँकेत पैसे जमा झाले की त्याची माहिती प्रत्येक गावात दिल्या जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. जिल्हा नियोजन सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
अनेक योजनांसाठी केवायसी ही आता बंधनकारक आहे. बऱ्याच वेळी केवायसी होऊनही अनेक निराधारांना याबाबत माहिती नाही. या योजनेद्वारे केवायसी झालेल्या लाभार्थ्यांची गावनिहाय यादी त्या-त्या ग्रामपंचायत येथे लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीने दर बुधवारी समाधान दिवस, मंगळवारी शिबीर व इतर उपक्रम तालुका पातळीवर घेतल्या जात आहेत. प्रत्येक तहसिलदाराने 5 गावांना भेटी दिल्या पाहिजेत. या भेटीच्या वेळी तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित राहून नागरिकांच्या ज्या काही तक्रारी असतील त्याचे निराकरण तेथेच करतील, असे त्यांनी तालुका अधिकाऱ्यांना बजावून सांगितले. ज्या गावात तहसिलदार जाणार आहेत त्याची माहिती जाण्यापूर्वी कळविणे अपेक्षित आहे. याबाबत प्रत्येक तहसील कार्यालयाचे तपासणी करु असे त्यांनी स्पष्ट केले.
सर्व सामान्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी पट्टे वाटप मोहीमेला अधिक गती मिळाली पाहिजे. यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींचा सर्वे करुन जे पात्र ठरतील त्यांच्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ग्रामीण भागासाठी असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या गावात उपस्थित असलेच पाहिजे. याबाबत जिओ फेन्सींगद्वारे काटेकोर खातरजमा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.