अमरावती : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षेच्या एप्रिलमधील दुसऱ्या सत्राचे आयोजन २ ते ९ एप्रिलदरम्यान केले जाणार आहे. या संदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने तारखांची घोषणा केली आहे. यापूर्वी जानेवारी सत्रात जेईई मेन्स परीक्षा घेतली होती. यावेळी परीक्षा देणारे ८० टक्के विद्यार्थी पुन्हा चांगल्या स्कोअरसाठी परीक्षा देतात. या सत्रात विद्यार्थी संख्या जास्त आहे. त्‍यामुळे एप्रिल महिन्यात होणारे जेईई मेन्‍सचे दुसरे सत्र विद्यार्थ्यांसाठी अधिक स्पर्धात्मक आणि कठीण असणार आहे. प्रत्येक शिफ्टमध्ये देशभरातून १.१५ लाख परीक्षार्थी असल्याने अधिक स्पर्धा असेल, असा अंदाज तज्‍ज्ञांनी व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एप्रिलनंतर विद्यार्थ्‍यांना या वर्षी जेईई मेन्‍समध्ये बसण्याची संधी मिळणार नाही. याची माहिती विद्यार्थ्‍यांना आहे. त्‍यामुळे जानेवारीपेक्षा एप्रिलमध्ये जास्त प्रयत्न केले जातात. जानेवारीमध्ये परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांकडे एप्रिलचा पर्याय असतो, परंतु एप्रिलनंतर हा पर्याय उपलब्ध नसतो. त्यामुळे आपले गुण व पर्सेंटाइल सुधारण्याची ही अखेरची संधी विद्यार्थ्यांना असणार आहे.

जानेवारीत झालेल्‍या परीक्षेचा निकाल फेब्रुवारीत जाहीर करण्यात आला होता. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना जेईई मेन्स परीक्षा देण्याच्या दोन संधी उपलब्ध करून दिल्या जातात. यांपैकी चांगली कामगिरी असलेल्या परीक्षेतील गुण ग्राह्य धरून त्याआधारे राष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली जाते. जानेवारी सत्राची परीक्षा झालेली असून, आता बारावीची लेखी परीक्षा संपल्यानंतर एप्रिलमध्ये परीक्षेची दुसरी संधी उपलब्ध केली जाणार आहे.

वेळापत्रकानुसार २, ३, ४ आणि ७, ८ एप्रिलला बीई/बीटेकसाठीचा पेपर क्रमांक एक होणार आहे. या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि दुपार सत्रामध्ये दुपारी तीन ते सायंकाळी सहा या सत्रनिहाय परीक्षा घेतल्या जातील. ही परीक्षा संगणकावर आधारित (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) असेल. आर्किटेक्चर व डिझाइन क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पेपर क्रमांक २ चे आयोजन ९ एप्रिलला केले जाणार आहे. देशभरातील विविध शहरांवरील परीक्षा केंद्रावर तसेच देशाबाहेर १५ शहरांतील केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. जानेवारी सत्रात एकूण १२.५८ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. एप्रिल सत्रात ११.४८ लाख विद्यार्थी बसण्याची अपेक्षा आहे. जुन्या कलानुसार, एप्रिलमध्ये पाच ते दहा गुणांचे नुकसान किंवा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकतो, असे तज्‍ज्ञांचे मत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second jee mains session for national institution admissions will be held from april 2nd and 9th mma 73 sud 02