पांढरकवडा तालुक्यातील बहात्तर या अतिमागास गावातील सचिन ओमप्रकाश तालकोकुलवार या तरूणाची ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ या संस्थेत पर्यावरण व विकास या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या विद्यापीठातून शिक्षण घेतले त्या विद्यापीठात सचिनला शिक्षणाची संधी मिळणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मात्र, या विद्यापीठात शिक्षणासाठी येणाऱ्या खर्चाची जुळवाजुळव होत नसल्याने सचिन व त्याचे पालक ही संधी हुकण्याच्या भीतीने चिंतेत आहे.

बहात्तर या गावात आजपर्यंत बस गेली नाही, त्या गावातून सचिनची परदेशी शिक्षणासाठी निवड झाली. शेतीला ग्रासलेल्या जागतिक तापमानवाढ व हवामान बदलाच्या समस्येचा मागोवा घेणयासाठी व शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा बहर आणण्याचे स्वप्न उराशी घेऊन परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे सचिनचे प्रयत्न आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स व्यतिरिक्त युनिव्हर्सिटी ऑफ वॉरविकमध्ये जागतिक शाश्वत विकास आणि ग्लासगो विद्यापीठामध्ये ऍडम स्मिथ बिझनेस स्कूलमध्ये पर्यावरण व शाश्वत विकास या पदव्युत्तर विषयांनासुद्धा सचिनला प्रवेश मिळाला आहे. मात्र, या शिक्षणासाठी लागणारे २८ लाखांचे शुल्क जमा कसे आणि कुठून करायचे, ही चिंता सचिन व त्याच्या कुटुंबियांना सतावत आहे. सचिनचे कुटुंब शेतीवर उदरनिर्वाह करून जेमतेम परिस्थितीत जीवन जगत आहेत. आपली आर्थिक क्षमता नसल्याने मुलाची परदेशी उच्च शिक्षणाची संधी हुकणार, या चिंतेने त्याचे पालक स्वत:च्या परिस्थितीला दोष देत आहेत.

हेही वाचा >>>नागपूर: अतिक्रमणाचा विळखा आता देशातील संरक्षित स्थळांनाही

बहात्तर या गावात फक्त चौथी पर्यंत शाळा आहे. त्यामुळे पुढील शिक्षण सचिनने वसतिगृहात राहून पूर्ण केले. वाणिज्य शाखेत पदवी परीक्षेत तो अमरावती विद्यापीठातून गुणवत्ता यादीत सहावा आला होता. प्रांरभी सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी केली. मात्र, पदरी निराशा आली. अपयशाने खचून न जाता समाजसेवेत करिअर करण्यासाठी त्याने टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये समाजसेवा विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. तो आता नीती आयोग मार्फत ‘सर्वांसाठी शिक्षण’ या उपक्रमांतर्गत सर्वांना मोफत व दर्जेदार शिक्षण पोहचविण्यासाठी काम करतो आहे.

हेही वाचा >>>उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात ‘अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना तत्‍काळ मदत’, अमरावती विभागात ७ हजार ४०० हेक्‍टरांवरील पिकांचे नुकसान

भविष्यात शेती क्षेत्राला स्थायित्व देण्यासाठी शेती व शाश्वत विकास आधारावर विदर्भात काम करण्याची त्याची इच्छा आहे. सचिन सध्या मानव-वन्यजीव संघर्ष व हवामान बदल या क्षेत्रात शैक्षणिक भर घालतो आहे. लंडनमधील शिक्षण आपले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी सुवर्ण संधी असल्याचे तो सांगतो. त्याला एकलव्य फाउंडेशनच्या ग्लोबल स्कॉलर प्रोग्राममधून परदेशी शिक्षणासाठी मार्गदर्शन मिळाले आहे. आपल्या यशाचे श्रेय तो ‘टीस’च्या प्रा. रेखा मॅमेन, प्रा. बेक, विशाल ठाकरे, राजू केंद्रे आदींना देतो. मात्र, परदेशी शिक्षणासाठी लागणाऱ्या २८ लाखांचे प्रवेश शुल्क व राहण्यासह इतर खर्च भागविण्याचे मोठे आव्हान असून त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. तसेच समाजातील दानशूर व्यक्ती, संघटनांकडून मदत किंवा शासनाकडून शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सचिनने सांगितले. प्रकाशमान होऊ पाहणारी ही ज्ञानज्योत परिस्थितीअभावी काळवंडणार नाही, यासाठी समाजाचा पुढाकार महत्वाचा ठरणार असल्याची प्रतिक्रिया सचिनचे शिक्षक प्रा. घनश्याम दरणे यांनी व्यक्त केली.