लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा : वैद्यकीय सेवेला गांधीवादी विचारांच्या कसोटीवर तपासून आरोग्य क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणारे ज्येष्ठ गांधीवादी धीरूभाई मेहता यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८८ वर्षाचे होते. त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.

सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे ते अध्यक्ष होते. पेशाने सनदी लेखापाल व पुढे नामवंत उद्योगांचे संचालक राहलेल्या मेहता यांची पार्श्वभूमी गांधीवादी विचारांची होती. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. आणीबाणीस त्यांनी प्रखर विरोध केला होता. पुढे कस्तुरबा संस्थेच्या त्यावेळी अध्यक्ष असलेल्या गांधीजींच्या मानस कन्या सुशीला नायर यांची १९८२ मध्ये त्यांची भेट झाली होती. संस्थेचा आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम बघावे, अशी विनंती झाल्यावर ते संस्थेशी कायमचे जुळले.

आणखी वाचा-वा रे पोलीस! प्रेमी युगुलांची लुटमार, हफ्तावसुली…

सुशीलाबेन यांच्या पश्चात त्यांच्याकडे संस्थेचे अध्यक्षपद आले. या चाळीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी कारभाराची काही मापदंड निश्चित केली. संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालय तसेच अन्य उपक्रमात गांधी विचार अढळ राहील, याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. औषध कंपन्यांच्या विळख्यात सापडलेल्या रुग्णास यातून मुक्त करावे म्हणून त्यांनी सेवाग्रामच्या रुग्णालयात जेनेरिक औषधाचा पुरस्कार केला. तरीही संस्थेचा आलेख उंचावत ठेवण्यात त्यांना यश आले. कारभार हाती घेताना ८० लाख रुपयांची उलाढाल असलेली ही संस्था वार्षिक २४० कोटी रुपये उलाढाल करणारी ठरली, अशी माहिती उपाध्यक्ष परमानंद तापडिया यांनी दिली. गरजूंना सेवा मिळावी म्हणून मेळघाट येथे त्यांनी आरोग्य सेवा केंद्र सुरू केले होते.

आणखी वाचा-नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…

मेहता हे गांधींनी स्थापन केलेल्या नवजीवन ट्रस्ट व कस्तुरबा गांधी नॅशनल मेमोरियल इंदूर या संस्थेचे ते विश्वस्त होते. या संस्थेचे देशभरात ४५० पेक्षा अधिक सेवा केंद्र असून त्या मार्फत महिला उन्नतीचे कार्यक्रम चालतात. गुजरात येथील सेवानंद मिशन, जन्मभूमी व अन्य वृत्तपत्रे चालवीणाऱ्या सौराष्ट्र ट्रस्ट, गांधी पीस फॉउंडेशन, गांधी स्मारक निधी, विविध पुरस्कार देणाऱ्या जमनालाल बजाज फॉउंडेशन, मनिभवन व अन्य विख्यात संस्थांचे ते विश्वस्त होते. भारतीय विद्या भवनचे संचालक म्हणून तसेच गुजरात विद्यापीठाचे सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिली होती. सरदार पटेल व अन्य पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. उद्योग क्षेत्रात बजाज ऑटो, मुकुंद लिमिटेड, बजाज फायनान्स, निशे फायनान्स या कंपन्यांचे ते संचालक होते. आयुष्यातील ५५ वर्षांत त्यांनी सातत्याने मोठी पदे भूषविली.

गेल्या काही दिवसापांसून त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. ज्येष्ठ सर्वोदयी राधाकृष्ण बजाज यांचे ते जावई होत. त्यांच्या मागे मुलगा निरद, कन्या मैत्री व मोठा गांधीवादी परिवार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior gandhian dhirubhai mehta passed away pmd 64 mrj