नागपूर: ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यामध्ये आतापर्यंत शिक्षण उपसंचालक दर्जाच्या पाच अधिकाऱ्यांना अटक झाली आहे. आता शिक्षकांच्या मान्यतेचे बनावट प्रस्ताव सादर करून शाळेत शिक्षक भरती करणाऱ्या संस्थाचालकांवरही कारवाई होणार आहे. अनेक संस्थाचालकांविरोधात विशेष तपास पथकाकडे(एसआयटी) तक्रारी आल्या असून त्यांचाही तपास केला जाणार आहे.
या घोटाळ्यात १०५६ नियुक्त शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली. २०१९ ते २०२५ पर्यंत गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ तयार करून शासनाचे कोट्यवधी रुपये लाटण्यात आले. शिक्षण संस्था चालक, शिक्षण उपसंचालक आणि वेतन अधीक्षकांच्या संगनमताने लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार करून हा सर्व घोटाळा झाला.
संस्थाचालकांनीही यात आर्थिक गैरप्रकार केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अनेक शिक्षक आणि त्यांच्या नातेवाईकांनी संस्थाचालकांविरोधात ‘एसआयटी’कडे तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार, आता संस्थाचालकांवर कारवाईचे संकेत मिळत आहेत.
शाळांमध्ये संस्थाचालकांचे नातेवाईक
अनेक शाळांमध्ये संस्थांचालकांचे नातेवाईक नोकरीला आहेत. तसेच, वरिष्ठ शिक्षकांना खालच्या पदावर ठेवून नातेवाईकांना पदोन्नती दिली गेली आहे. हा अधिकार संस्थाचालकांना असतो. याचा गैरफायदा घेण्यात आल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, काही शिक्षकांचा पैशांसाठी छळ सुरू असून त्यांचे वेतन रोखण्यात आल्याच्याही तक्रारी आहेत.
‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात संस्थाचालकही एसआयटीच्या रडारवर आहेत. आमच्याकडे अनेक संस्थांविरोधात तक्रारी आहेत. त्यांची चौकशी होणार आहे. तसेच नीलेश वाघमारे आणि मेंढे हे दोघेही फरार असून तपास सुरू आहे. – सुनीता मेश्राम, सहाय्यक पोलीस आयुक्त व एसआयटी प्रमुख.
वंजारी, जामदार, मंघामची कारागृहात रवानगी
शालार्थ आयडी घोटाळ्याचा ‘एसआयटी’कडून कसून तपास सुरू असून अटकेत असलेले चिंतामण वंजारी, वैशाली जामदार, आणि लक्ष्मण मंघाम यांची कारगृहात रवानगी करण्यात आली.