पदाधिकाऱ्यांच्या कृत्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगेश राऊत, लोकसत्ता

नागपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच व नेतृत्व शिवसेनेच्या हाती येताच उपराजधानीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची दादागिरी वाढली आहे. शिवसेनेचे पदाधिकारी सर्रास खंडणी मागत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही कार्यकर्त्यांच्या कृत्यांमुळे  शिवसेनेची प्रतिमा मलीन होत असल्याची प्रतिक्रिया आता शिवसेनेच्याच गोटातून उमटू लागली आहे.

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या उत्साहाचा वापर पक्ष वाढीसाठी होणे अपेक्षित आहे. पण, उपराजधानीतील चित्र याउलट आहे. काही शिवसेना पदाधिकारी लोकांना धमकावणे,  खंडणी मागणे आणि  फसवण्याचे काम करीत आहेत.

या प्रकारातील ताज्या क्रमात अजनी पोलीस ठाण्यात युवासेना जिल्हा प्रमुख विक्रम राठोड व शिवसेना विभागप्रमुख संजोग राठोड यांच्याविरुद्ध  सावकाराकडून ८ लाखांची खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. एकाला रंगेहात पकडण्यात आले.  शिवसेना शहरप्रमुख मंगेश कडव याच्याविरुद्ध तर तक्रारींची रिघ लागली आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला. बजाजनगरमध्येही गुन्हा दाखल झाला असून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

सर्वसामान्य लोकांची मदत करण्याचे सोडून शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी माया जमवण्याच्या मागे लागले आहेत.  उपराजधानीतील शिवसेनेत खंडणीबाज पदाधिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. या पदाधिकाऱ्यांना वेळीच आवर न घातल्यास पक्षाची प्रतिमा आणखी धुळीस मिळण्याची भीती काही पदाधिकाऱ्यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केली. यासंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी खासदार प्रकाश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

‘मुंबई पॅटर्न’ची अंमलबजावणी व्हावी

मुंबईमध्ये शिवसेना शाखेला प्रचंड महत्त्व आहे. मुंबईत आधार कार्ड बनवण्यापासून ते  लोकांना रुग्णालयात दाखल करण्यापर्यंतची कामे शिवसेना शाखेतून केली जातात. यामुळे अधिकाधिक लोक शिवसेनेशी जोडली जातात. उपराजधानीत शहर व जिल्हा कार्यालयात क्वचितच लोक दिसतात. शाखा कार्यालयांचा तर पत्ताच नाही. मुंबई पॅटर्ननुसार शिवसेनेने उपराजधानीतही कार्य केले तर कार्यकत्रे, पदाधिकाऱ्यांच्या हाताला योग्य काम मिळून पक्ष वाढीस लागेल, असे मत या पक्षातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

आणखी आठ ते दहा गुन्हे दाखल होणार !

शिवसेना शहरप्रमुख मंगेश कडव याच्याविरुद्ध गुन्हे शाखेकडे तक्रारीचा ओघ सुरू झाला असून जवळपास ८ ते १० गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. त्याच्याविरुद्ध बलात्काराचीही एक तक्रार प्राप्त झाली असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.   नवीन प्रकरणात कडवने रेल्वेत तिकिट तपासनीसाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एकाला गंडा घातला. या प्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात लवकरच गुन्हा दाखल करण्यात येत असून एका तरुणीने कडवविरुद्ध बलात्काराचीही तक्रार गुन्हे शाखेकडे दिली आहे. गुन्हे शाखेकडे कडवविरुद्ध तक्रारींचा ओघ वाढला  आहे. कडव सध्या फरार असून त्याने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

 

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena workers bullying after establishment of maha vikas aghadi government