भंडारा : आज सकाळपासून समाज माध्यमांवर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. शिवशाहीमधील एक महिला वाहक चालकाच्या डोक्यावर चक्क छत्री घेऊन  त्याच्या मागे उभी आहे.  मुसळधार पावसात शिवशाही गळत असल्याने भिजत असलेल्या चालकाला महिला वाहकाने छत्रीचा आधार घेत ओले होण्यापासून वाचविले.

भंडारा आगाराची वातानुकूलित शिवशाही गोंदियाच्या दिशेने जाण्यासाठी निघाली मात्र काल सकाळपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शिवशाहीला गळती लागली.  गळत असलेल्या शिवशाहीच्या चालकाच्या डोक्यावर चक्क छत्री धरून महिला चालकाने ओले होण्यापासून त्याचे संरक्षण केले. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर शिवशाही बसच्या दुरावस्थेबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली.

काल सकाळपासून भंडाऱ्यात मुसळधार पाऊस बरसला. मुसळधार पावसात चक्क शिवशाही या वातानुकूलित एसटी बसला गळती लागल्याचं बघायला मिळालं. भंडारा आगाराची ही बस  भंडाऱ्यावरून प्रवाशांना घेऊन गोंदियाच्या दिशेने जात होती. मुसळधार पावसात शिवशाहीच्या छतावरून ठीक ठिकाणाहून पाऊस बरसू लागला. प्रवाशांसह चालकाच्या अंगावर पावसाचं पाणी पडत असल्यानं शिवशाही बसची वाहक चक्क छत्री घेऊन त्यांच्या पाठीमागं उभी राहिली. एसटी चालकच नाही तर या गळतीचा फटका शिवशाही मधील प्रवाशांनाही बसला.

शिवशाहीच्या गळतीचा व्हिडिओ वाहक संध्या साखरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर टाकल्यानं अधिकाऱ्यांनी महिला वाहकाला चांगलंच धारेवर  धरल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर याबाबत स्पष्टीकरण मागत निलंबन करण्याची धमकी दिली. हा संपूर्ण प्रकार कर्तव्यावरून परतल्यानंतर घडला असता या महिला वाहकानं कारवाईचा धसका घेतल्यानं त्यांना चक्कर आल्यानं त्या एसटी आगाराच्या कार्यालयात कोसळल्या आणि त्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले अशी माहिती आहे.

भंडाऱ्यातील शिवशाही बस गाड्यांची मोठी दुरावस्था झाली असून शिवशाही मध्ये प्रवाशांना चक्क छत्री घेऊन बसण्याची वेळ आली आहे. यावरून एसटीच्या हायटेक बस गाड्यांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे समोर येत आहे. आरामदायी प्रवास व्हावा म्हणून एसटीचे प्रवाशी शिवशाही बसने प्रवास करणं पसंत करतात मात्र सध्या एसटीच्या हायटेक बस गाड्यांची अवस्था पाहून कुणालाही धक्का बसेल. दरम्यान एसटीच्या हायटेक बस गाड्यांची अशी दयनीय अवस्था  असेल तर मग लालपरीची काय अवस्था असेल? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, महिला वाहक संध्या साखरे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांना संपर्क केला असता त्यांची प्रकृती घासाल्याने त्यांना रुग्णालयात नेत असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. एसटी महामंडळात असलेला भोंगळ कारभार आणि एसटी बसेसच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने हा सर्व प्रकार होत असताना एखाद्या कर्मचाऱ्याला अशा प्रकारे धारेवर धरणे आणि दबाव तंत्र आणणे कितपत योग्य आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. महिला वाहकाने वस्तुस्थिती लोकांसमोर आणली ही तिची चूक आहे का असाही प्रश्न आता निर्माण केला जात आहे. एसटी महामंडळ प्रशासनाने स्वतःच्या चुका झाकून आरसा दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याचेही बोलले जाते.याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी भंडारा आगार प्रमुख श्रीमती  लिमजे यांना वारंवार संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.