नागपूर : केंद्र सरकार बँकांची फसवणूक होऊ नये म्हणून विविध उपाययोजना केल्याचा दावा करते. परंतु, वर्ष २०२३-२४ या काळात देशातील ६३ बँकांची तब्बल १४ हजार ५९५.५७ कोटी रुपयांनी फसवणूक झाली. त्यापैकी केवळ ७५३.८९ कोटी रुपयांची वसुली झाल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकारातून पुढे आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) अखत्यारित देशातील सर्व राष्ट्रीयीकृत व सहकारी बँका येतात. त्यापैकी विविध ६३ बँकांची ३ लाख ४६ हजार ५९ नागरिकांकडून तब्बल १४ हजार ५९५.५७ कोटी रुपयांनी फसवणूक झाली. तर एकूण फसवणुकीपैकी केवळ ७५३.८९ कोटी रुपयांची वसुली करण्यात या बँकांना यश मिळाल्याचे माहिती अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले.

हेही वाचा – रुग्णांच्या जीवाशी खेळ, नागपुरातील ११९ हॉस्पिटल्समध्ये अग्निशमन सुरक्षा कार्यान्वित नाही

फसवणुकीतील परत मिळालेली रक्कम एकूण फसवणुकीच्या तुलनेत केवळ ५.१६ टक्केच आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी बँकेत ठेवलेली इतर ९५ टक्के रक्कम कधी वसूल होणार? हा प्रश्न या क्षेत्रातील जाणकार उपस्थित करत आहे. अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारात आरबीआयला या प्रकरणांपैकी काहींमध्ये किती बँक कर्मचारी सहभागी असल्याबाबतही विचारले होते. परंतु, २०२३- २४ या वर्षातील माहिती उपलब्ध नसल्याचे आरबीआयचे केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी विनोद कुमार यांनी कोलारकर यांना लेखी कळवले आहे.

बँकांमध्ये १६.७९ लाख कर्मचारी कार्यरत

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अखत्यारित असलेल्या देशभरातील बँकांमध्ये वर्ष २०२१ मध्ये १४ लाख ९० हजार ९३९ कर्मचारी कार्यरत होते. ही संख्या २०२२ मध्ये १५ लाख ३० हजार ८१० कर्मचारी तर २०२३ मध्ये १६ लाख ७९ हजार ५५ कर्मचारी असल्याचेही माहितीच्या अधिकारातून पुढे आले.

हेही वाचा – नागपूर : अस्वच्छतावीर… तीन वर्षांत दीड लाख उपद्रवींवर कारवाई, १८ कोटी ४१ लाखांचा दंड

ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी महत्वाचे…

प्रत्येकाने इंटरनेटवरून माहिती घेताना ऑनलाईन माहितीचे संकेतस्थळ, व्यवहार, विक्रेत्याची सत्यता तपासायला हवी. सुरक्षित पेमेंट पद्धती वापरावी. अज्ञात लिंक किंवा पॉप- अपवर क्लिक करणे टाळावे. मजबूत पासवर्ड वापरावे. वारंवार स्वत:चे पासवर्ड बदलावे. अनपेक्षित ईमेल किंवा कॉल प्राप्त करताना सावधगिरी बाळगावी. अज्ञात क्रमांकावर कोणतेही व्यवहार करू नये. नवीनतम सुरक्षा सॉफ्टवेअरसह तुमचा संगणक आणि मोबाइल डिव्हाइस अद्यावत ठेवायला हवा. बँकेतील व्यवहार आणि केडिट कार्ड स्टेटमेंट वारंवार तपासायला हवे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking 14595 crore fraud with banks mnb 82 ssb