चंद्रपूर : रेल्वेने तांत्रिक कारण समोर करून जिल्ह्यात युरियाची रॅकच पाठविली नाही. गेल्या काही महिन्यांपासून अत्यल्प युरियाचा साठा शिल्लक आहे. त्यातच आता पाऊस थांबला. धान, सोयाबीनला युरिआची मात्रा देण्याची वेळ आली आहे. युरियाची मागणी वाढली असतानाच दुसरीकडे पुरेसा साठाच उपलब्ध नसल्याने सध्या शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. युरियाला नॅनो युरियाचा पर्याय यंदा कृषी विभागाने उपलब्ध करून दिला आहे. मात्र, नॅनो युरिया वापरण्याबाबत शेतकऱ्यांत संभ्रम आहे. सध्या कृषी विभागाकडे साडेसहा हजार मेट्रिक टन युरियाचा साठा शिल्लक आहे. एक-दोन दिवसांत युरियाची रॅक येणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागणीच्या तुलनेत होणारा पुरवठा, कच्च्या मालाचे वाढते दर यामुळे हंगाम बहरत असतानाच युरियाची टंचाई निर्माण झाली आहे. पीकवाढीसाठी युरिआ महत्त्वाचा मानला जातो. पेरणीदरम्यान आणि पेरणीनंतर पीक वाढीसाठी युरिआचा वापर मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात. यंदा कृषी विभागाने शेतकऱ्यांसमोर नॅनो युरियाचा पर्याय उपलब्ध करून दिला. मात्र, नॅनो खताचे महत्त्व पटवून देण्यास कृषी विभाग मागे पडला. सोबतच नॅनो युरिया वापरण्याबाबतही शेतकऱ्यांत संभ्रम आहे. त्याचा परिणाम नॅनो युरिया शेतकरी वापरत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने धान, सोयाबीन आणि कापसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सोयाबीनवर पिपळा मोझॅक, खोडकूज, मूळकुजचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. त्यामुळे या पिकाच्या उत्पन्नात मोठी घट येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस थांबला आहे. त्यामुळे धानासोबत कापसालाही युरियाची मात्रा देण्याची वेळ आता आली आहे. खासकरून धानासोबत कापशीलाही आता युरिआच्या मात्राची गरज आहे.

हेही वाचा – “शिवसेनेसोबत ‘बोलणी’ झाली, पण लग्नाची तारीख निघायची बाकी!” प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेस, राष्ट्रवादी भटजी, ते…”

सध्या युरिआची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्या तुलनेत युरियाचा साठा बाजारात नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कृषी आयुक्तालयाकडे युरियाची मागणी केली जाते. आयुक्तालय आरसीएफ कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्याला युरियाचा पुरवठा करते. हंगाम सुरू होण्याआधी युरियाचा साठा मिळाला होता. त्यानंतर युरियाचा साठा येणार होता. मात्र, तांत्रिक कारणामुळे रेल्वेने गेल्या दीड महिन्यांपासून युरियाची रॅक जिल्ह्याला पाठवली नाही. जुना असलेला स्टॅाक आता हळूहळू संपत आला आहे. सध्या साडेसहा हजार मेट्रिक टनच साठा शिल्लक आहे. त्यातच आता पावसाने उसंत घेतल्याने युरिआची मागणी वाढली. मात्र, त्या तुलनेत युरियाचा साठा शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हेही वाचा – नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सफारी सुरू, कोका सफारी लांबणीवर; कारण काय? जाणून घ्या…

दरम्यान, काही दुकानांमध्ये युरिया उपलब्ध नाही. उद्या कृभको आणि आठवडाभरात नर्मदा, आरसीएमचा पुरवठा होत आहे, असे कृषी विकास अधिकारी राजपूत यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shortage of urea in chandrapur district rsj 74 ssb