अमरावती : येथील पक्षी निरीक्षक, छायाचित्रकारांनी गेल्‍या वर्षभरात जिल्‍ह्यात स्‍थलांतर करून आलेल्‍या तब्‍बल सहा नवीन पक्ष्‍यांची नोंद केली आहे. त्‍यात उलटचोच तुतारी, समुद्री बगळा, काळ्या पंखाचा कोकीळ-खाटीक, लाल छातीची फटाकडी, लहान कोरील आणि गुलाबी तिरचिमणी या पक्ष्‍यांचा समावेश आहे. साधारणपणे सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या स्थलांतराच्या एक वर्ष कालावधीत पक्षी- छायाचित्रकार आणि निरीक्षक यांनी या नोंदी केल्‍या आहेत.

मध्य भारतात सप्टेंबर महिन्यात सुरू होणारे हिवाळी पक्षी स्थलांतर ही सुरुवात समजली जाते. मे आणि जून महिन्यात हे पक्षी परतीची वाट धरतात. या परतीच्या स्थलांतरासोबत काही पक्ष्यांच्या उन्हाळी स्थलांतराचीही स्थिती तयार होते. सदर कालावधीला एक स्थलांतर-वर्ष समजण्याचा प्रघात आहे. या वर्षात प्रशांत निकम पाटील, शुभम गिरी, धनंजय भांबुरकर, संकेत राजूरकर, अमेय ठाकरे, सौरभ जवंजाळ, अभिमन्यू आराध्य आणि मनोज बिंड यांनी जिल्ह्यातील विविध जलाशये आणि जंगलप्रदेशात जिल्ह्याकरिता सदर पक्ष्यांच्या छायाचित्रासह प्रथम नोंदी केलेल्या आहेत.

हेही वाचा : आरटीई प्रवेशाची यादी लांबणीवर, प्रवेशासाठी पुन्हा वाट…

या पक्षीप्रजाती मध्ये उलटचोच तुतारी ( टेरेक सँडपायपर ) हा पक्षी उत्तर युरोपातून ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात भारतात दक्षिणेकडे जाण्यासाठी येतो. समुद्री बगळा ( वेस्टर्न रीफ हेरॉन ) हा भारतात समुद्र किनारपट्टीलगत निवासी पक्षी असला तरी काही प्रमाणात अन्न शोधार्थ स्थानिक स्थलांतर करतो. लाल छातीची फटाकडी ( रडी ब्रेस्टेड क्रेक ) मूलतः निवासी आहे. काळ्या पंखाचा कोकीळ-खाटीक ( ब्लॅक विंग ककूश्राईक ) हा छोटा पक्षी हिमालयाच्या पायथ्याशी तसेच भारताच्या उत्तरपूर्व भागात आढळतो. लहान कोरल ( व्हीम्बरेल) हा पक्षी थेट आर्टिक खंडातून जुलै ते ऑक्टोबर महिन्यात भारतात येतो. या सोबत २०२२ मध्ये टिपलेला परंतु या वर्षी ओळख पटलेली गुलाबी तिरचिमणी ( रोझी पीपीट ) यांचा समावेश आहे. हा पक्षी हिमालय आणि त्यासारख्या उंच थंड प्रदेशात वीण घालून हिवाळ्यात दक्षिणेकडे येतो.

जिल्‍ह्यातील जलाशयांच्या काठावरील चिखल आणि त्यातील कीटक, अळ्या यांची समृद्धी सुद्धा चिखलपक्ष्यांसाठी पर्वणी ठरते. भरीस भर म्हणून हिवाळ्याच्या सुरुवातीस देशाच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावरून पूर्व किनाऱ्याकडे आणि उन्हाळ्यात पुन्हा उलट असा लांब पल्ल्याचा प्रवास करणारे समुद्री पक्षी सुदधा अवचितपणे या प्रदेशाचा तात्पुरता विश्रांती थांबा म्हणून उपयोग करतात. या नव्या नोंदीमुळे जिल्ह्यातील पक्षी यादी ४०० पर्यंत पोहोचली आहे.

हेही वाचा : पुणे अपघाताची नागपुरात पुनरावृत्ती…..अल्पवयीन कारचालकाने सहा जणांना चिरडले….

अनियमित येणाऱ्या पक्ष्यांचेही दर्शन

यावर्षी अनेक आश्चर्यकारक आणि वैचित्र्यपूर्ण नोंदीची शक्यता पक्षीनिरीक्षकांनी आधीच वर्तवली होती. त्या अंदाजास अनुसरून जिल्ह्यात अनियमित स्थलांतर करणारा मोठा रोहित ( ग्रेटर फ्लेमिंगो), टायटलरचा पर्ण वटवट्या, लाल पंखांचा चातक, ह्युग्लिनीचा कुरव ( ह्यूग्लिन गल ) यासारख्या पक्ष्यांनी अमरावती जिल्ह्याला दिलेल्या भेटीही काही वर्षाच्या अवकाशानंतर यावर्षी नोंदवण्यात यश आले आहे.