यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यवतमाळ येथील सभा निर्विघ्न पार पडावी यासाठी सभेत अडचण आणू शकणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. विविध शेतकरी नेत्यांसह काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्याना पोलिसांनी नोटीस देऊन आज सकाळपासून विविध ठिकाणी स्थानबद्ध केले.

महागाव येथील शेतकरी नेते मनीष जाधव, पुसद येथील साकीब शहा, यवतमाळचे सिकंदर शहा अशा अनेकांना स्थानबद्ध करण्यात आले. यवतमाळ येथे बचत गट मेळाव्यात महिलांना संबोधित करण्यासाठी मोदी येणार आहेत. या सभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी घेत, सामाजिक कार्यकर्त्यांना नोटीस बजावल्या. मोदींच्या सभेनिमित्त समाज माध्यमातून कोणीही संभ्रम निर्माण करणाऱ्या पोस्ट, चित्रफिती पसरवू नये, याबाबतही अनेकांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकाराबाबत जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा – सावधान! येत्या ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

हेही वाचा – कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने राज्यातील वीज यंत्रणा सलाईनवर.. ‘या’ आहेत मागण्या…

शेतकरी संघटना आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्थानिक आझाद मैदानात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मोदींच्या विरोधात निषेध आंदोलन केले. पंतप्रधान मोदींच्या यवतमाळ दौऱ्याला शिवसेना ठाकरे गटाचा विरोध असल्याचे या पक्षाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदींनी २०१४ आणि २०१९ मध्ये शेतकरी आणि बचत गटाच्या महिलांना दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण केले नाही, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे मोदींना आता महिलांनी आणि शेतकऱ्यांनीच जाब विचारावा असे मत किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान मोदी यांच्या सभेसाठी जिल्ह्यातील हजारो महिला यवतमाळ येथे दाखल झाल्या आहेत.