नागपूर : इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारा मुलगा वारंवार नापास होत असल्यामुळे आई-वडिलांनी त्याला याबाबत विचारणा केली. आईवडिलांचे हे विचारणे सहन न झाल्याने मुलाने आईवडिलांचा खून केला. अगदी क्षुल्लक कारणावरुन मुलाने धक्कादायक पाऊल उचलल्यामुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कपीलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे दुहेरी हत्याकांड उघडकीस आले. लीलाधर डाखोळे आणि अरुणा डाखोळे असे खून झालेल्या दाम्पत्याचे नावे आहे. तर उत्कर्ष लीलाधर डाखोळे (२४, खसाळा, कपीलनगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावत मुलाला अटक केली.

हेही वाचा >>> उच्च न्यायालयात सफाई कामगाराची जागा, पगार तब्बल ५२ हजार…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लीलाधर डाखोळे हे कोराडी वीज केंद्रात टेक्निशियन पदावर नोकरीवर होते तर पत्नी अरुणा डाखोळे या संगीता विद्यालयात शिक्षिका होत्या. त्यांना मुलगा उत्कर्ष (२४) आणि मुलगी सेजल (२१) अशी दोन मुले होती. उत्कर्ष हा इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकतो तर मुलगी बीएएमएसच्या प्रथम वर्षाला शिकते. उत्कर्ष हा गेल्या दोन वर्षांपासून वारंवार नापास होत होता. त्यामुळे शिक्षिका असलेल्या आईने त्याला   बैलवाड्याला असलेली त्यांची शेती कसण्यास सांगितले होते.  वडिल लीलाधर यांनीही  इंजिनिअरिंग झेपत नसेल तर आयटीआय किंवा पॉलिटेक्निकला प्रवेश घेण्याचा सल्ला मुलाला दिला होता. त्यामुळे त्याला आईवडिलांचा राग आला. घरात वारंवार त्याला शिक्षण सोडून देऊन शेती करण्यासाठी टोमणे मारण्यात येत होते. २५ डिसेंबरला वडिलांनी उत्कर्षला मारहाण केली आणि शिक्षण सोडून शेतीवर जाण्यास सांगितले. आईने त्याची बॅग भरुन ठेवली होती. आता इंजिनिअरिंग सोडून पॉलिटेक्निकला प्रवेश घ्यावा लागेल, अशी  भावना त्याच्या मनात आल्यामुळे तो अस्वस्थ होता.

हेही वाचा >>> चंद्रपूर – नागपूर मार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघे ठार

आईच्या खूनानंतर तासाभराने वडिलांचा खून

आईवडिलांमुळे  आपल्या  शैक्षणिक भवितव्याचे वाटोळे होणार या भावनेने  उत्कर्ष अस्वस्थ होता. त्यामुळे त्याने आईवडिलांचा काटा काढण्याचा कट रचला. गेल्या २६ डिसेंबरला विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यात आई व्यग्र होती. उत्कर्षने आईचा दोन्ही हातानी गळा आवळून खून केला. त्यानंतर तो आईच्या मृतदेहाजवळ बसून होता. तासाभराने त्याचे वडिल घरी आले. त्यांना घरातील घटना पाहून धक्काच बसला. ते सोफ्यावर बसलेले असताना उत्कर्षने मागून येऊन त्यांच्या मानेवर चाकूने वार केले त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दोघांचेही मृतदेह घरात ठेवून  उत्कर्ष घर बंद करुन बाहेर निघून गेला.

असे आले हत्याकांड उघडकीस

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लीलाधर यांना शुभेच्छा देण्यासाठी एक मित्र घरी आला. त्याला घरातून दुर्गंधी आली. त्याने शेजाऱ्यांना माहिती दिली. ठाणेदार महेश आंधळे यांनाही माहिती देण्यात आली. पोलिसांनी घराचे दार तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यांना अरुणा आणि लीलाधर यांचे मृतदेह दिसले. मुलगा आणि मुलीबाबत चौकशी केली असता दोघेही बोखारा येथे राहणाऱ्या काकांकडे गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोन्ही भावंडाना घरी आणले. पोलिसांना उत्कर्षच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. त्यामुळे पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने आईवडिलांचा खून केल्याची कबुली दिली.

गेल्या आठ दिवसांत ९ हत्याकांड गेल्या आठ दिवसांत ९ हत्याकांडाच्या घटना नागपुरात उघडकीस आल्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची स्थिती आहे. शनिवारीसुद्धा गांधीबागमध्ये दुहेरी हत्याकांड घडले होते. तर रविवारी जरीपटक्यातील ख्रिश्चन कब्रस्तानात शिंदे हत्याकांड घडले. गुरुवारी आणि शुक्रवारीसुद्धा अजनी आणि धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे एकेकाळी दरारा असलेली गुन्हे शाखा आता अवैध धंदेवाल्यांकडून वसुली करण्यात मग्न असल्याची चर्चा होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son kills parents over minor reason in nagpur adk 83 zws