बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली जाणारी कामगिरी जिल्हा काँग्रेसचे सचिव, प्रसिद्ध विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्ते अॅड. शरद राखोंडे यांनी केली आहे. दक्षिण कोरिया येथे नुकत्याच पार पडलेल्या फुल आयर्नमॅन ट्रायथालॉन स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदवला आहे. जागतिक पातळीवर खडतर समजली ही स्पर्धा राखोंडे यांनी १४ तास ३८ मिनिटांत पूर्ण केली आहे. ते जिल्ह्यातील पहिलेच ‘फुल आयर्नमॅन’ ठरले आहे. त्यांच्या या यशामुळे बुलढाणा जिल्ह्याचा लौकिक जागतिक पातळीवर गेला आहे.
ही स्पर्धा जगातील सर्वात कठीण ट्रायथलॉन पैकी एक मानली जाते. ज्यात ३.८ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किमी मॅरेथॉन हे तीन कठीण टप्पे सलग एकाच दिवशी पूर्ण करावे लागतात. त्यामुळे ही स्पर्धा केवळ शारीरिकच नव्हे, तर प्रचंड मानसिक क्षमता आणि आत्मशिस्त यांची कसोटी, किंबहुना खेळाडूंची अग्निपरीक्षा ठरते.
आयर्नमॅन स्पर्धा ही जरी त्यांची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कामगिरी असली, तरीही अॅड. राखोंडे यांनी यापूर्वीही विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांचे हे यश म्हणजे दीर्घकालीन परिश्रम, कठोर प्रशिक्षण आणि न थांबणाऱ्या जिद्दीचे प्रतीक आहे. त्यांच्या या अद्वितीय यशामुळे संपूर्ण जिल्ह्याचा गौरव वाढला असून, क्रीडा आणि फिटनेस क्षेत्रात नव्या पिढीला प्रेरणा देणारे ते एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. ‘जर इच्छाशक्ती असेल तर काहीही अशक्य नाही’ हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.
सामाजिक क्षेत्रातही कार्यरत
बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात वकील असणारे अॅड. राखोंडे हे जिल्हा काँग्रेस समितीचे सचिव आहेत. जिल्ह्यातील अनेक नामांकित पतसंस्थांच्या संचालक मंडळावर ते कार्यरत असून ‘महात्मा फुले मंडळा’च्या माध्यमातून त्यांनी अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवले आहे.