नागपूर : शाळा स्तरावर तंबाखू्मुक्तीबाबत जनजागृतीसाठीच्या स्कूलबेसड् प्रोग्राम फाॅर अवेअरनेस रिसर्च ॲन्ड नाॅलेज (स्पार्क) या पथदर्शी प्रकल्पाची लवकरच नागपुरातून सुरुवात होणार आहे. कालांतराने हा प्रकल्प राज्यातही राबवला जाईल. या प्रकल्पाची जबाबदारी नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाकडे सोपवण्यात आली आहे.

स्पार्कचा शुभारंभ ऑगस्ट महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आवश्यक साॅफ्टवेअरचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पाअंतर्गत नागपूर शहरातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली जाईल. त्यासाठी नागपूर महापालिका, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय एकत्र काम करतील. दंत महाविद्यालयाच्या चमूकडून विविध शाळांमध्ये तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम सांगितले जातील. त्यासाठी चलचित्रांचा वापर केला जाईल.

बालपणापासून मुलांना तंबाखू, सुपारीचे दुष्परिणाम सांगितल्यास त्यांना पुढे व्यसन लागणार नाही, असा यामागचा उद्देश आहे. त्याबाबतचे आदेश शासनाकडून दंत महाविद्यालयाला देण्यात आले आहेत. नागपुरातील प्रकल्प यशस्वी झाल्यावर राज्यभरात त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही आदेशात नमूद आहे, अशी माहिती शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मंगेश फडणाईक यांनी दिली. या प्रकल्पाचे राज्य समन्वयक डॉ. दर्शन दक्षिणदास आहेत. विद्यार्थ्यांचा सर्व डेटा साॅफ्टवेअरच्या माध्यमातून ऑनलाईन अपलोड केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात त्यातून नवनवीन संशोधन व अभ्यासासाठी मदत होणार असल्याचेही डॉ. फडणाईक यांनी सांगितले.

स्पार्क प्रकल्पाच्या राज्य समन्वयांचे म्हणने काय ?

नागपुरात तंबाखूमुक्तीचा स्पार्क हा पथदर्शी प्रकल्प सुरू होत आहे. कालांतराने त्याची राज्यात अंमलबजावणी होईल. याद्वारे वाईट व्यसनांपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यास मदत होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या अभिनव प्रकल्पाची कल्पना पुढे आली आहे, अशी माहिती स्पार्क प्रकल्पाचे राज्य समन्वयक व शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. दर्शन दक्षिणदास यांनी दिली.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडन आदिवासींवर कोणते संशोधन झाले?

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकतर्फे पूर्व विदर्भातील ८० टक्केहून जास्त आदिवासी बांधवांचे संख्या असलेल्या गावांची निवड करून ब्लाॅसम हा संशोधन प्रकल्प राबवला गेला. प्रकल्पानुसार येथील आदिवासी बांधवांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यांच्यातील आजारांवर संशोधन सुरू आहे. त्याबाबतचा अहवालही पुढे आला असून आता या समाजातील रुग्णांवर उपचाराचीही सोय आरोग्य विद्यापीठ जवळच्या शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या मदतीने करणार आहे. या भागात आदिवासींमध्येही तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाचे प्रमाण जास्त आढळले आहे.