नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालानंतर मुलाखती घेण्यात आल्या. १ हजार ५१६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. ३० ऑक्टोबरपर्यंत या मुलाखती चालल्या असून रात्री निकाल जाहीर करण्यात आला.
यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लमकणे राज्यात पहिला आला आहे. तर हिमालय घोरपडे राज्यातून दुसरा आला आहे. एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली. निकालासह पात्रतागुणही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे विजय नागनाथ लमकणे यांची यापूर्वही एमपीएससीमधून विविध सेवांसाठी निवड झाली आहे. विजय लमकणे सध्या गटविकास अधिकारी या पदावर ते कार्यरत आहेत.
एमपीएससीतर्फे २७ ते २९ मे या कालावधीत राज्य सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर मुलाखती घेण्यात आल्या. मुख्य परीक्षेमधून मुलाखतीकरीता अर्हताप्राप्त न ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपुस्तिकेतील गुणांची फेरपडताळणी करायची असल्यास संबंधित उमेदवारांनी गुणपत्रके प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक होते. परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या समांतर आरक्षणाच्या, तसेच अन्य मुद्यांसंदर्भात विविध न्यायालयात, न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले.
राज्यसेवा परीक्षा आली होती चर्चेत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने नुकतीच राज्यसेवा २०२४ च्या मुख्य परीक्षेच्या कट ऑफ जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आजपर्यंतचा सर्वाधिक कट ऑफ या परीक्षेत लागल्याने विद्यार्थ्यांना चांगलाच घाम फुटला आहे. या परीक्षेत ओपनचा कट ऑफ ५०७.५० लागला आहे. अनुसूचित जातीचा ४४७ तर अनुसूचित जमातीचा ४१५ कट ऑफ लागला होता. मुख्य परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेमध्ये काही तांत्रिक अडचणीही निर्माण झाल्या होत्या. तांत्रिक अडचणीमुळे अर्ज सादर करण्यास अडथळा निर्माण असल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात काही उमेदवारांकडून विविध माध्यमातून मागणी होत असल्याचे आयोगाच्या कार्यालयाच्या निदर्शनास आले होते. परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र एकूण ७९७० उमेदवारांपैकी एकूण ७७३२ उमेदवारांनी मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर केले होते. उर्वरित पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याकरीता ऑनलाईन अर्जप्रणाली सुरळीत असून उमेदवारांकडून अर्ज सादर करण्याची संधी दिली होती. मुख्य परीक्षेनंतर १ हजार ५१६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. त्यांच्या मुलाखती झाल्या असून निकाल जाहीर करण्यात आला आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये १४०९ उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे.
मुलींमधून आरती जाधव तर एससी प्रवर्गातून प्रगती जगताप पहिली
राज्यसेवा २०२४ चा निकाल जाहीर झाला असून यामध्ये मुलींमधून राज्यातून आरती जाधव पहिल्या आल्या असून प्रगती जगताप एससी प्रवर्गातून पहिल्या आल्या आहेत. प्रगती जगताप या सध्या नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यावर्षीच्या निकालात अनेक मुलींनी बाजी मारली आहे.