नागपूर : शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास दुप्पट परतावा मिळेल, असे आमिष दाखवून ठकबाज दाम्पत्याने शहरातील अनेकांची तब्बल २.३७ कोटी रुपयांची फसवणूक करत पलायन केले आहे. वर्धा मार्गावरील उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या सोनेगाव पोलीस हद्दीत फसवणुकीची ही घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे, फसवणूक झालेले नागरिक सुशिक्षित असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

प्रफुल्ल सुधाकर चाटे (४३, सिंधू छाया, भेंडे लेआऊट) व त्याची पत्नी अवनी अशी ठगबाज पती-पत्नींची नावे आहे. हे दोघेही सोनेगाव हद्दीत महालक्ष्मी फायनान्शिअल सर्व्हिसेस नावाने फर्म चालवत होते. या फर्मच्या माध्यमातून शेअर बाजारात पैसे गुंतवणूक केली जाते, असे चित्र त्यांनी तयार केले. यातूनच अमरिन चांद खान पठाण (३६, गोपालनगर) यांची प्रफुल्ल चाटे सोबत ओळख झाली. ‘मनी व्ह्यू’ ॲपद्वारे कर्ज मिळवून पठाणने डिसेंबर २०२३ पर्यंत एक लाख रुपये गुंतवले. सुरुवातीला परतावा मिळाल्याने त्यांचा विश्वास वाढला. त्यामुळे नोव्हेंबर २०२४ पर्यंत त्यांनी आणखी ९ लाख ६० हजार रुपये गुंतवले. मात्र, ठगबाज चाटे दाम्पत्याने पठाण यांना फेब्रुवारी २०२५ पासून परतावा देणे बंद करत टाळाटाळ सुरू केली. काही दिवसानंतर दोघांनी त्यांचे भ्रमणध्वनीही बंद केले.

पठाण यांनी चौकशी केली असता चाटे दाम्पत्याने याच पद्धतीने कल्पना दुबे, मिलिंद जोशी, अतुल सावरकर, सरिता मोहने, सरिन आझाद, गणेश उईके, संजय वैरागडे, उमंग जैन यांच्यासारख्या १९ जणांना गंडा घातल्याची बाब समोर आली. पठाण यांच्या तक्रारीवरून चाटे दाम्पत्याविरोधात सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

चार ठगबाज भावंडांना अटक

नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे कोलकाता येथील बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणात गेल्या १५ वर्षांपासून फरार चार ठगबाज भावंडांना केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) सोमवारी रात्री अटक केली. यातल्या तिघांना नागपूर येथून तर एकाला छत्रपती संभाजी नगर येथून अटक करण्यात आली. यातील दोघांवर सीबीआयने प्रत्येकी एक लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते.

राजकुमार चुरेवाल (६१), माधव चुरेवाल आणि दीपक चुरेवाल अशी नागपुरातून अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा चौथा भाऊ राजेश चुरेवाल (५९) याला छत्रपती संभाजीनगरातून अटक झाली. सीबीआयच्या कोलकाता युनिटने २००४ मधील बँक फसवणूक प्रकरणात राजकुमार, माधव चुरेवाल या दोघांविरोधात २००७ मध्ये गुन्हा दाखल केला होता.

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २०१० मध्ये या चोघांनाही फरार घोषित केले होते. राजकुमार व राजेशवर सीबीआयने प्रत्येकी एक लाखाचे बक्षीस होते. या चौघांचाही देशपातळीवर शोध सुरू होता. आरोपींनी आणखी एका बँकेकडून कर्ज घेतले होते. फरार झाल्यावर आरोपींनी बनावट नावांनी बनावट सरकारी ओळखपत्रे मिळवून खरी ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. त्यांची खोटी नावे व निवासी पत्त्यांबद्दल सीबीआयला सुगावा लागला होता.
कोलकाताच्या पथकांनी रविवारी नागपुरात येऊन राजकुमार, माधव आणि दीपक चुरेवाल या तिघांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली. राजेश चुरेवाल याला छत्रपती संभाजी नगर येथून अटक झाली. आरोपींना कोलकाता येथील सक्षम न्यायालयात हजर केले जाईल.