|| महेश बोकडे

राष्ट्रीय जळीत रुग्ण धोरणाबाबत चाचपणी; मुंबई, नागपूरच्या संस्थेचा समावेश

नागपूर :  मुंबई, नागपूर येथील प्रत्येकी एक वैद्यकीय संस्थेसह देशातील विविध भागातील एकूण १० संस्थांमध्ये जळीत रुग्णांबाबत सखोल अभ्यास होणार आहे. त्यासाठी  केंद्र असलेल्या जिल्ह्यातील लोकसंख्येच्या मानाने जळीत रुग्णांचे सर्वेक्षण केले जाईल. राष्ट्रीय जळीत रुग्णांबाबत धोरण तयार करण्यासाठीची ही चाचपणी असल्याचे बोलले जात आहे.

केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस, नवी दिल्ली आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवला जात आहे. त्यासाठी देशाच्या विविध भागातील दहा वैद्यकीय संस्थांची निवड झाली असून त्यात  मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्र्रेंनग अ‍ॅन्ड रिसर्च आणि नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) समावेश आहे. 

या प्रकल्पानुसार, प्रत्येक संस्थेला  संबंधित जिल्ह्यातील निश्चित घरांचे सव्र्हे करून तेथील जळीत रुग्णांबाबतची माहिती गोळा करायची आहे. जळीत रुग्णांवर प्राथमिक उपचाराबाबत किती जनजागृती आहे, जळीत रुग्णांचे लोकसंख्येच्या मानाने प्रमाण किती आहे, जळीत रुग्णांच्या जगण्याचा दर्जा कसा आहे, जळीत रुग्णांबाबत सामाजिक भावना कशी आहे, या रुग्णांवर उपचाराची सोय कशी आहे, या रुग्णांचा इतरांशी व त्यांच्यासोबत नागरिकांच्या वागण्याची पद्धत कशी आहे, याची माहिती गोळा करायची आहे. हे काम करताना प्रकल्पांतर्गत नागरिकांमध्ये जळीत रुग्णांवरील प्राथमिक उपचारासह इतर माहितीबाबत जनजागृती करायची आहे. या जनजागृतीचा नागरिकांवर किती परिणाम झाला, हे तीन महिन्यांनी फेर सर्वेक्षण करून जाणून घ्यायचे आहे. या प्रकल्पाचे प्रमुख अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस येथील प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. समिक भट्टाचार्य आणि येथील सामाजिक जनऔषधीशात्र विभागाच्या प्रमुख डॉ. नीलम रॉय आहेत. नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये सामाजिक जनऔषधशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. उदय नारलावार हे या प्रकल्पाचे काम बघतील.

सर्वेक्षण कसे होणार?

’ प्रकल्पाअंतर्गत निवड झालेल्या संस्थांना त्यांच्या जिल्ह्यातील प्रत्येकी ३,४०० घरांचा  सव्र्हे करायचा आहे.

’ त्यातील १,७०० घरे शहरी भागातील तर १,७०० घरे ग्रामीण भागातील राहतील.

’ शहरी भागातील १,७०० घरांमध्ये १ हजार झोपडपट्ट्या, ३५० स्वतंत्र घरे, ३५० अपार्टमेंटमधील घरांचा समावेश . 

’ ग्रामीणमध्ये १ हजार कच्चे घर, ७०० पक्क्या घरांमध्ये हे सर्वेक्षण होईल.

’ या प्रकल्पांतर्गत संबंधित संस्थेतील जळीत रुग्णांचाही अभ्यास केला जाणार आहे.

या संस्थांमध्ये अभ्यास…

हा प्रकल्प नागपूरच्या मेडिकल कॉलेज, मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्र्रेंनग अ‍ॅन्ड रिसर्च, एम्स (पटना), पीजीआय (चंदीगड), लखनऊतील के. जी.एम.सी., एम्स (भूवनेश्वर), इम्फाल येथील रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस, श्रीनगर येथील एस.के.आय.एम.एस., जयपूर येथील एस. एम.एस., चेन्नईतील मेडिकल कॉलेज या वैद्यकीय संस्थांमध्ये राबवला जाणार आहे.

मेडिकलसह देशातील दहा वैद्यकीय संस्थांमध्ये जळीत रुग्णांचा सखोल अभ्यास लवकरच सुरू होईल. येथील सामाजिक जनऔषधशास्त्र विभाग आणि प्लास्टिक सर्जरी विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे काम होईल. अभ्यासातून जळीत रुग्णांची परिपूर्ण माहिती पुढे येण्यास मदत होईल. – डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर.