नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या‘दी प्रॉब्लेम ऑफ रुपी’ प्रबंधाचा समावेश असलेल्या इंग्रजीतील सहाव्या खंडाचा अनुवाद २० वर्षानंतर प्रकाशित झाला. मात्र प्रकाशनानंतर यात अनेक चुका आढळल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले. स्वतंत्र बैठक घेऊन चुका दुरुस्त करण्याचे निर्देश उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांनी बैठकीत दिले होते. मात्र अद्यापही या खंडातील चूका दुरुस्त केल्या नसल्याची तक्रार पुन्हा करण्यात आली. ही बाब लक्षात घेत उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांनी नव्याने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रीय प्रबंध व संकीर्ण लिखाणाचा इंग्रजी भाषेतील सहावा खंड २७ वर्षांपूर्वी प्रकाशित झाला. या खंडाचा मराठी अनुवाद करण्याचा निर्णय समितीने घेतला. तत्कालिन सदस्य सचिव वसंत मून यांच्या पुढाकारातून प्रा. विजय कविमंडन यांनी अनुवाद झाला. मुद्रिते तयार झाली. २० वर्षांपेक्षा अधिक काळ हा खंड पडून होता. प्रकाशनासाठी त्यावेळी ७५ लाख रुपयांची तरतूद केली होती. मात्र, बाबासाहेबांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रूपी’ या प्रबंधाचा समावेश असलेला हा अनुवादित खंड प्रकाशित झाला नव्हता. दरम्यान डॉ. वसंत मून यांचे निधन झाले.

२०२१ मध्ये डॉ. कृष्णा कांबळे सदस्य सचिव झाले. त्यांनी या खंडाकडे जातीने लक्ष देत डॉ. कांबळे यांनी १४ एप्रिल २०२१ पर्यंत ‘दी प्रॉब्लेम ऑफ रुपी’ प्रबंध असलेल्या इंग्रजीतील सहाव्या खंडाचा अनुवाद प्रकाशित करण्यावर भर दिला. प्रकाशनासाठी अनुवादाच्या खंडाच्या काही प्रती तयार करून समितीला सादर केले. मात्र १४ एप्रिल २०२१ रोजी ‘जनता’ नियतकालिकाचा अंक प्रकाशित झाले. तर करोनामुळे १६ एप्रिल २०२१ रोजी डॉ. कांबळे यांचे अचानक निधन झाले आणि अनुवादीत सहाव्या खंडाचे प्रकाशन लांबले. पुढे सदस्य सचिव प्रा. प्रदीप आगलावे यांच्या काळात प्रकाशन झाले.

भारतीय दलित पॅंथरचे म्हणणे काय

सहाव्या इंग्रजी खंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोनंतर ‘कम्पलाईड बाय वसंत मून’ असे स्पष्ट लिहिले होते. मात्र अनुवादाच्या सहाव्या खंडातून हे नाव वगळण्यात आले. याशिवाय दिवंगत डॉ. कृष्णा कांबळे यांचे नाव संकलक म्हणून होते. परंतु कांबळे यांचे नाव वगळण्यात आले, अशाप्रकारची तक्रार भारतीय दलित पॅंथरचे प्रकाश बनसोड यांनी उच्च शिक्षण संचालनालयाकडे केली. उच्च शिक्षण संचालनालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीचे सदस्य सचिव यांना यासंदर्भात विचारणा करणारे पत्र दिले होते. आता पुन्हा २८ मार्च २०२५ रोजी विद्यमान सदस्य सचिव यांना चुका दुरुस्तीसंदर्भात विचारणा करत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

समितीतर्फे मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांचे साहित्य प्रकाशित झालेले आहे. परंतु अशाप्रकारच्या तक्रारी प्रसिद्धीसाठी केल्या जात आहेत. मला अजून तरी असे पत्र प्राप्त झालेले नाही. पत्र मिळाल्यानंतर त्याचे उत्तर देण्यात येईल. अनुवादित खंड ६ ची नवीन आवृत्ती प्रकाशित झाल्यानंतर या चुका दुरुस्त करण्यात येतील.प्रा प्रदीप आगलावे, सदस्य सचिव, डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समिती