चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जटायू संवर्धन योजनेअंतर्गत दहा महिन्यांपूर्वी २१ जानेवारी रोजी सोडण्यात आलेल्या दहापैकी ३ पांढऱ्या जटायू (गिधाड)चा मृत्यू झाल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याच्या वन विभागाने दहा महिन्यांपूर्वी एक प्रयोग केला. त्यामध्ये हरयाणा राज्यातल्या पिंजोर येथील संशोधन केंद्रातील धोकाग्रस्त व नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले अतिशय दुर्मिळ १० पांढरे जटायू पक्षी ताडोबातील केंद्रात आणण्यात आले होते. या सर्व गिधाडांना प्रथम या वनक्षेत्राच्या वातावरणाची सवय व्हावी या हेतूने त्यांना येथे उभारण्यात आलेल्या ‘प्री-रिलीज एवेयरीमध्ये तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. ४ जुलैला बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वरिष्ठ वैज्ञानिकांनी या सर्व १० गिधाडांना ‘जीएसएम ट्रान्समिशन ट्रकिंग डिव्हाईस’ही लावले होते. जटायू हा रामायणातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून अवघ्या देशात जटायू अर्थात, गिधाडांची संख्या रोडावली असल्याने त्यांच्या संवर्धनाची गरज लक्षात घेता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला होता.

हेही वाचा – लोकजागर: दोन पक्षातला फरक!

हेही वाचा – काँग्रेसी सौभाग्यवती भाजपच्या आमदार पतीबाबत म्हणतात, मंत्रिपद भेटल्यास…

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बोट्झरी येथील जंगलात एक मोठा पिंजरा तयार करून त्यात या १० जटायूंना सोडले. तेथे ते तीन महिने राहिले आणि नंतर त्यांना निसर्गमुक्त करण्यात आले होते. या जटायूवर वन विभाग लक्ष ठेवून होता. मात्र अचानक २७ नोव्हेंबर रोजी या तीन जटायूंचा मृत्यू झाला. या तीन जटायूंचा मृत्यू सारख्या कारणाने झाल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले. या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tadoba project jatayu vulture death rsj 74 ssb