नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बफर क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट अशी ओळख असलेल्या ‘छोटा मटका’ या वाघाच्या सुटकेची शक्यता जवळजवळ संपली आहे. या वाघाच्या डाव्या पायाला अनेक ठिकाणी चीरा गेल्या आहेत. एवढेच नाही तर चारपैकी तीन सुळे देखील तुटले आहेत.नागपुरातील गोरेवाड्यातील वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील डॉक्टरांनी मंगळवारी या वाघाची तपासणी केली. ही एकूणच स्थिती पाहता या वाघाची जंगलातील सुटकेची शक्यता जवळजवळ संपली आहे. ताडोबातील ‘टी-१२६’ या ‘छोटा मटका’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघावर चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात उपचार सुरू आहेत. त्याची एकूणच स्थिती पाहता त्याला दीर्घकाळ उपचार घ्यावे लागणार आहेत. मात्र, त्यानंतरही त्याला जंगलात सोडण्याची शक्यता जवळजवळ संपली आहे.
नागपुरातील गोरेवाडा वन्यजीव संशोधन केंद्राचे संचालक डॉ. शिरीष उपाध्ये व डॉ. विनोद धूत यांनी मंगळवारी या वाघाची वैद्यकीय तपासणी केली. क्ष-किरण तपासणीत या वाघाच्या डाव्या पायाच्या ‘अल्ना’ हाडाच्या खालच्या भागात ‘फ्रॅक्चर’ असल्याचे निदान झाले. ‘अल्ना’ लहान तर ‘रेडियस’ हे मोठे हाड असते. या जखमा एवढ्या गंभीर आहेत की, त्यावर उपचार होईलच याची शक्यता अतिशय कमी आहे. कारण वाघ त्याच्या शिकारीवर पहिल्यांदा याच पायाने हल्ला करतो. वाघाच्या पायाची नखेही नेहमीच्या जागेवरुन विस्थापित झाली आहेत. विशेष म्हणजे शिकारीसाठी वाघ ज्या चार सुळ्यांचा वापर करतो, त्यातील तीन सुळे तुटलेले आहेत. शिकारीसाठी वापरला जाणारा डावा पाय आणि सुळेच मोडल्यामुळे जंगलात त्याला शिकार करता येणे शक्य नाही. या वाघाचे दोन सुळे हे सुरुवातीलाच दुसऱ्या वाघासोबत झालेल्या लढाईत तुटलेले होते. जवळपास २०७ किलो वजनाचा हा वाघ आता कायमचा जायबंदी होण्याचीच शक्यता अधिक आहे.
आताच्या स्थितीत त्यावर शस्त्रक्रियेची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. हाडांना नैसर्गिकरित्या उपचारात मदत व्हावी म्हणून अन्नातून त्याला औषध देण्यात येणार आहे. त्यामुळे सध्यातरी या वाघाला आठ दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतरच त्याच्या भवितव्याचा निर्णय घेण्यात येईल. या वाघाला सुरुवातीलाच आठ दिवस निरीक्षण करुन त्यानंतर उपचाराचा निर्णय घेतला असता तर कदाचित या वाघाचे भवितव्य सुरक्षित राहीले असते, असे पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, काही वन्यजीवप्रेमींनी या संपूर्ण प्रकरणाची तक्रार वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे.
लढाई कधी…
१३ मे २०२५ रोजी ‘टी-१२६’ म्हणजेच ‘छोटा मटका’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघाची ‘टी-१५८’ म्हणजेच ‘ब्रम्हा’ या वाघासोबत अधिवासासाठी लढाई झाली. यात ब्रम्हा वाघ जागीच मरण पावला. तर छोटा मटका रक्तबंबाळ झाला. बुद्धपोर्णिमेच्या रात्रीचा हा थरार अनेक पर्यटकांनी पाहीला. त्याचवेळी या वाघाला उपचाराची नितांत गरज असल्याचे वन्यजीवतज्ज्ञांनी सांगितले. मात्र, ताडोबातील कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने तो नैसर्गिकरित्या ठीक होईल, असे ताडोबा व्यवस्थापनाला सांगितल्यामुळे त्याच्यावरील उपचाराचे मार्ग बंद झाले.
न्यायालयाची भूमिका
महिनाभरानंतरही नैसर्गिकरित्या वाघाच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी ती आणखी गंभीर झाली. ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर तब्बल महिनाभराने त्याला बेशुद्ध करुन वेदनाशामक औषध देण्यात आले. मात्र, त्यानंतरही तो कायम तीन पायावरच चालत होता आणि डावा पाय त्याला टेकवता देखील येत नव्हता. ‘लोकसत्ता’ने पुन्हा एक बातमी प्रकाशित केली आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने त्याची दखल घेत जनहित याचिका दाखल केली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने २७ ऑगस्टला त्याला उपचारासाठी जेरबंद केले. मात्र, त्याची प्रकृती आता हाताबाहेर गेली असून त्याच्या नैसर्गिक अधिवासातील सुटकेच्या आशा जवळजवळ मावळल्या आहेत.