अमरावती : पितृमोक्ष अमावस्येमुळे (सर्वपित्री अमावस्या) ‘नवभारत साक्षरता अभियान’ अंतर्गत २१ सप्टेंबर रोजी होणारी असाक्षरांची चाचणी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. श्राद्ध आणि इतर धार्मिक कार्यक्रमांमुळे या दिवशी असाक्षर व्यक्ती परीक्षेसाठी उपस्थित राहू शकणार नाहीत, असे समितीने म्हटले आहे. याबाबतचे निवेदन राज्याचे शिक्षण आयुक्त आणि इतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात पितृमोक्ष अमावस्येच्या दिवशी श्राद्धाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर पार पाडले जातात. याच दिवशी ‘नवभारत साक्षरता अभियान’ची परीक्षा आयोजित केल्यामुळे परीक्षेला अपेक्षित असाक्षर व्यक्ती उपस्थित राहणार नाहीत, अशी भीती शिक्षक समितीने व्यक्त केली आहे. त्यामुळे २१ सप्टेंबर रोजी होणारी ही चाचणी स्थगित करून दुसऱ्या दिवशी घ्यावी, अशी विनंती शिक्षक समितीने पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य नेते उदय शिंदे यांच्यासह राज्य उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची नावे निवेदनात नमूद आहेत. अमरावती जिल्हा शाखेनेही विभागीय शिक्षण संचालकांना निवेदन देऊन ही चाचणी पुढे घेण्याची मागणी केली आहे, असे समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी सांगितले.
काय आहे साक्षरता अभियान?
नवभारत साक्षरता कार्यक्रम (एनआयएलपी) हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेला एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश देशातील १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या निरक्षर व्यक्तींना साक्षर बनवणे आहे. हा कार्यक्रम केवळ वाचणे आणि लिहिणे शिकवण्यापुरता मर्यादित नाही, तर निरक्षर व्यक्तींना जीवनावश्यक कौशल्ये शिकवून त्यांना स्वावलंबी बनवण्यावर भर देतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून साक्षर होणाऱ्या व्यक्तींच्या चाचण्या घेऊन त्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
पितृमोक्ष अमावस्येचे महत्व काय?
पितृ मोक्ष अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो. ज्यांच्या पूर्वजांची पुण्यतिथी त्यांना आठवत नाही, किंवा ज्यांचा मृत्यू अकाली किंवा अपघाती झाला असेल, अशा सर्व पितरांसाठी या दिवशी श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण केले जाते. या दिवशी गरजू लोकांना अन्न, वस्त्र आणि इतर वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी हे सर्व विधी केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो, पितृदोष दूर होतो आणि कुटुंबाला त्यांचे आशीर्वाद मिळतात अशी धार्मिक मान्यता आहे.
