लोकसत्ता टीम

नागपूर : वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर गोळी झाडून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहकारी गीता शेजवळ हिच्या शोधासाठी नागपूर गुन्हे शाखेचे विशेष पथक अहमदनगरला रवाना झाले आहे. त्यांनी गीता शेजवळ यांच्या घराची झडती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संकेत आणि गीता या दोघांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याने गोळीबार कांडात दोघेही आरोपी आहेत.

बजाजनगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये ५ मे २०२२ ला मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्या घरी सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी सुटली होती. संकेत घरून कर्तव्यावर जाण्यासाठी गणवेश परिधान करतांना त्यांच्या पायावरून उंदीर गेला. त्यामुळे त्या गडबडीत रिव्हॉल्वर डाव्या बाजूला खाली पडून त्यातील गोळी झाडल्या गेली. ती गोळी त्यांच्या डाव्या पायाच्या पोटरीमधून आरपार निघून उजव्या पायाच्या पोटरीमध्ये जाऊन फसल्याचा संकेतचा दावा होता.

आणखी वाचा-जहाज बांधणीच्या साहित्यापासून बनवली सर्वांत मोठी हनुमान कढई, महाराष्ट्रात प्राणप्रतिष्ठेसाठी बनवणार सहा हजार किलो हलवा

मात्र, ती गोळी लागली नव्हती तर गीता शेजवळ यांनी संकेतवर गोळी झाडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी गीता शेजवळवर खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. तर संकेत गायकवाड यांच्यावर पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक विशेष पथक अहमदनगरला रवाना केले आहे. ते पथक गीता हिचा शोध घेत अशून तिच्या घराची झडतीसुद्धा घेण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.