वर्धा: शालेय जीवनात मुलांना सर्वाधिक आनंद होतो, जेव्हा उन्हाळी सुट्ट्या जाहीर होतात. परीक्षा सुरू असतानाच सुट्ट्यांबाबत चर्चा सुरू होते. पूर्वी पत्र, तर आता फोन करीत मामाला कळवल्या जाते की, आम्ही या तारखेस येणार. पण आता उन्हाळी क्लासेसचे पेव फुटल्याने या सुट्ट्या असे वर्ग अटेंड करण्यात जातात आणि मुलांचा हिरमोड होतो.

पण तरीही सुट्ट्यांची प्रतिक्षा असतेच. या पार्श्वभूमीवर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे अधिकृत सुट्टी वेळापत्रक जाहीर करण्यात आले. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष २०२५-२६ सुरू करण्याबाबत हे निर्देश आहेत. राज्यातील अशा सर्व शाळांच्या सुट्टीबाबत एकवाक्यता व सुसंगती असावी म्हणून हे निर्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना २ मे, शुक्रवारपासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम सुरू असतात, तेव्हा शाळा व्यवस्थापणास सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवार घेण्याचा अधिकार आहे. पुढील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ बाबत पण सूचना आहेत. विदर्भ वगळून इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा या १६ जून, सोमवारपासून सुरू करण्याचे निर्देश आहेत.

जून महिन्यात विदर्भाचे तापमान लक्षात घेण्यात आले आहे. म्हणून उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार, २३ जून ते २८ जून २०२५ दरम्यान सकाळच्या सत्रात सात ते पावणे बारा या दरम्यान चालतील. ३० जून, सोमवारपासून शाळा नियमित वेळेत सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक यांना या सूचना सर्व शाळांना निदर्शनास आणून देण्याचे सांगण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. श्रीराम पानझाडे तसेच प्राथमिक शिक्षणचे संचालक शरद गोसावी यांनी हे निर्देश दिलेत. या अधिकृत निर्देशामुळे सुट्ट्यांचा घोळ आज संपुष्टात आल्याचे म्हटल्या जाते. शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्या, मात्र मामाच्या घरी जाण्याच्या मुहूर्त बदलला, असा सूर आता उमटू लागला आहे.

विदर्भ मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सतीश जगताप म्हणतात की, ७६ सुट्ट्या घेण्याचे सूत्र आहे. त्यामुळे असे नियोजन करताना सुसूत्रता असणे अपेक्षित आहे. कारण सुट्टी सुरू होण्याचा कालावधी मग वेगवेगळा असू शकतो.