वाशिम : केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकर्यांना वर्षाला सहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ देण्याची घोषणा केली. शासन निर्णय निर्गमित करण्यात आला; मात्र केंद्राचा निधी अनेकांच्या खात्यावर जमा झालेला असताना राज्याचा निधी अद्यापही जमा झालेला नसल्याने शेतकर्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने शेतकर्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली. मंत्रिमंडळाकडून योजनेला मंजुरी प्रदान करण्यात आली. केंद्राप्रमाणे तीन टप्प्यांत प्रत्येक शेतकरी दोन हजार रुपये शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. पीएम सन्मान निधी योजनेचे लाभार्थी शेतकरी हे राज्य शासनाच्या योजनेसाठी पात्र असतील, असेही घोषित करण्यात आले. जिल्ह्यात अद्यापही राज्य शासनाचा पहिला हप्ता शेतकर्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. सध्या खरीप हंगामाची कामे जोमात सुरू आहेत. अनेकांना पैशाची चणचण भासत आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारच्या पहिल्या हप्त्याची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा झाली असती, तर शेतकरी कामासाठी उपयोगी पडली असती, असेही जिह्यातील शेतकर्यांकडून बोलले जात आहे.
हेही वाचा – कळपातून भरकटलेला रानटी हत्ती रस्त्यावर आला अन्… पहा गडचिरोलीतील व्हिडीओ
हेही वाचा – बुलढाणेकरांनो सावधान! येळगाव धरणात एक महिन्यापुरताच जलसाठा; लाखावर नागरिकांचा…
केंद्राचा चौदावा हप्ता शेतकर्यांच्या खात्यात नुकताच २८ जुलैला जमा झाल्यामुळे राज्याचा हप्ता कधी जमा होणार, असा सवाल शेतकर्यांकडून विचारला जात आहे.
