लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटीसह सगळ्या शासकीय रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या संपाने रुग्णसेवा कोलमडली आहे. गेल्या २४ तासांत मेडिकल, मेयोत १९ मृत्यू झाले असून हा दाखल रुग्णांच्या तुलनेत वाढता मृत्यूचा टक्का चिंता वाढवत आहे.

मेडिकलमध्ये करोनापूर्वी दीड हजाराच्या जवळपास रुग्ण दाखल रहायचे. त्यानंतरही येथे दिवसाला सरासरी १० ते ११ रुग्णांचा मृत्यू नोंदवला जायचा. मेयो रुग्णालयात सुमारे ६५० रुग्ण दाखल राहून दैनिक ६ ते ७ मृत्यू नोंदवले जात होते. दरम्यान संपामुळे दोन्ही रुग्णालयांसह सुपरस्पेशालिटी व इतर रुग्णालयांत अत्यवस्थ वगळता इतर रुग्णांचा दाखला बंद आहे. दुसरीकडे नियोजित शस्त्रक्रिया सातत्याने स्थगित होत असल्याने या रुग्णांनाही सुट्टी देऊन घरी पाठवले गेले. त्यामुळे सध्या मेडिकलला ८०७ तर मेयोत ३२२ रुग्ण दाखल आहेत. त्यानंतरही मेडिकलमध्ये २४ तासांत १५ तर मेयोत ४ मृत्यू नोंदवले गेले. ही संख्या दाखल रुग्णांच्या तुलनेत खूप जास्त असून आरोग्य विभागात चिंता वाढली आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून आवश्यक काळजी घेतली जात असल्याचा दावा केला आहे.

आणखी वाचा- सावधान.. जी- २० परिषदेवर ‘एच ३ एन २’, ‘करोना’चे सावट!

उपचाराचे चित्र

मेडिकलला दिवसभरात १,५९४ रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात तर पन्नासावर रुग्णांवर रुग्णालयात दाखल करून उपचार केले गेले. येथे १३ गंभीर तर ७४ किरकोळ शस्त्रक्रिया झाल्या. मेयोत बाह्यरुग्ण विभागात ७९९ रुग्णांवर तर ५३ रुग्णांवर दाखल करून उपचार केले गेले. येथे ११ गंभीर शस्त्रक्रिया झाल्या. एकही किरकोळ शस्त्रक्रिया झाली नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The patient death rate increased due to the strike mnb 82 mrj