महेश बोकडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : ‘महात्मा फुले नवीनीकरण ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित’ने (महाप्रीत) मागासवर्गीयांच्या रोजगारासाठी नवीन क्लृप्ती योजली आहे. त्यातून नागपुरातील कोराडी, खापरखेडासह चंद्रपूर येथील महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेचा वापर वाढण्यासह वेकोलिच्या बंद खाणी भरण्याच्या कामास मदत होईल. ही राख खाणीत टाकण्यापूर्वी प्रक्रिया करत त्यातील अपायकारक घटक काढले जाईल.

महानिर्मितीच्या विविध औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पात मोठय़ा प्रमाणात वेकोलिच्या खाणीतून कोळसा पुरवठा होतो. पैकी बऱ्याच खाणी कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर परिसरात आहेत. नियमानुसार वेकोलिने संबंधित खाणीतून संपूर्ण कोळसा काढल्यावर ही खाण पुन्हा मातीसह इतर साहित्य टाकून भरावी लागते. परंतु ती भरली जात नसल्याने पर्यावरणाचा गंभीर प्रश्न उपस्थित होतो. औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पातून निघणाऱ्या राखेचा १०० टक्के वापर व्हायला हवा. परंतु ते करण्यात प्रकल्पांना यश मिळत नाही. त्यामुळे राखेपासूनच्या प्रदूषणाची गंभीर समस्या वाढत आहे. महाप्रीतने या समस्यांवर तोडगा काढण्यासह त्यातून मागासवर्गीयांना मोठय़ा प्रमाणावर रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी आयआयटी आणि केंद्रीय खणन व इंधन अनुसंधान संस्थेची (सींफर) मदत घेतली जात आहे.

मागासवर्गीयांना रोजगार देण्यासह औष्णिक विद्युत केंद्रातील राखेची विल्हेवाट आणि वेकोलिच्या खाणी भरण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हा प्रकल्प फारदेशीर आहे. त्यासाठी महाप्रीत, महानिर्मिती, वेकोलित करार होईल. प्रकल्पानुसार मागासवर्गीयांच्या कंपन्यांना खानी भरण्यासाठी गाडय़ांसह इतरही मदत केली जाईल. सध्या कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर परिसरात संपूर्ण कोळसा काढलेल्या काही खाणी असून त्या या प्रकल्पातून भरल्या जाईल.

– बिपीन श्रीमाळी, मुख्य व्यवस्थापकीय संचालक, महाप्रीत, मुंबई.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thermal power plant ash processing closed mines ysh
First published on: 25-01-2022 at 00:02 IST