गोंदिया : बांगलादेशात नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या शेख हसीना यांच्या सत्तांतर नंतर तेथील हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहे. या हल्ल्यांच्या व महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ गोंदियात रविवारी, २२ सप्टेंबर रोजी हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून जाहीर निषेध करत जनआक्रोश रॅलीत सहभागी झाले.
यावेळी बांगलादेशवर कारवाई करण्याची मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली. ही जनआक्रोश रॅली सकाळी १० वाजता आंबेडकर चौक परिसरातून जयस्तंभ चौक येथून निघून शहरातील प्रमुख गांधी प्रतिमा चौक,चांदणी चौक ते दुर्गा चौक, गोरेलाल चौक ते नेहरू चौक मार्गावरून भ्रमण करीत नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक संकुलात पोहचली. राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे ही वाचा…नागपूर : आरक्षणाबाबत राहुल यांचे वक्तव्य चुकीचे, पण जीभ छाटण्याच्या वक्तव्याचे समर्थन नाही , आठवले
बांगलादेशात सत्ता पालट झाल्यानंतर तिथं अल्पसंख्याक हिंदूंवर अन्याय करीत त्यांच्या घरांची जाळपोळ, दुकानांची लुटपाट, हिंदू मंदिरांची तोडफोड आणि महिलांवर अत्याचाराची प्रकरणे सातत्याने समोर येत आहे. भारत सरकारो हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी हिंदू संघटना सातत्याने करत आहेत. गोंदियात ही बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज गोंदिया तर्फे रविवार, २२ सप्टेंबर रोजी जनआक्रोश रॅली काढण्यात आली.
आयोजित जनआकोश रॅलीत सहभागी होण्यासाठी रविवारी सकाळ पासूनच जयस्तंभ चौक परिसरात नागरिकांची गर्दी होऊ लागली होती. काही वेळातच ही मोठी गर्दी झाली. त्यानंतर हजारोंच्या संख्येने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक संकुलातून नागरिक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांचा जाहीर निषेध करत जनआक्रोशरॅलीत सहभागी होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढून घोषणाबाजी केली. या काळात जिल्हा पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक चौकात विविध संघटना कडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. या जनआक्रोश रॅलीला गोंदियातील विविध ७२ सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा दिला होता.
हे ही वाचा…नागपूर : काँग्रेसचा सर्व ६ जागांवर दावा, चेन्नीथला पटोलेंच्या उपस्थितीत आज बैठक
सरकारने ठोस पावले उचलावी
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ रविवारी सकल हिंदू समाज गोंदियाच्या हाकेवर ७२ हून अधिक सामाजिक, धार्मिक आणि हिंदू संघटनांचे अधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्याची मागणी करणारे फलक यात “मोसाद” ” पेजर” असे फलक लोकांनी हातात घेतले होते. त्याचवेळी लोक घोषणा देत होते. त्याचबरोबर हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी भारत सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही ते करत होते.