नागपूर : जानेवारी महिन्यात वाघांच्या मृत्यूसत्राने संपूर्ण राज्य हादरले होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अवघ्या २२ दिवसात ११ वाघ मृत्युमुखी पडले. त्यानंतर काही दिवसातच म्हणजे जानेवारीच्या अखेरीस राज्यात बहेलिया शिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वाघांच्या शिकारी केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली. आता भंडारा जिल्ह्यात शेतात वाघाचा बछडा मृतावस्थेत सापडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

११ फेब्रुवारीला भंडारा वन विभागअंतर्गत येणाऱ्या लेंडेझरी वनक्षेत्रातील सहवनक्षेत्र आलेसुर, नियतक्षेत्र खापा, मौजा मांडवी याठिकाणी बावनथडी कॅनलला लागून  शेतामध्ये वाघाचा बछडा मृत अवस्थेमध्ये आढळून आला.

माहिती मिळताच वनधिकारी वनकर्मचारी पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सदर मृत वाघ बछड्याजवळ दुसरा समवयस्क वाघ बछडा जिवंत अवस्थेत आढळून आला. मृत वाघ बछड्याचे बुधवारी  शवविच्छेदन करण्यात येणार आहे.  त्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

मृत वाघ बछड्याजवळ सापडलेला जिवंत बछडा अशक्त असल्याने त्याला सुरक्षितरित्या शीघ्र बचाव पथक भंडाराच्या मदतीने  पुढील उपचाराकरिता वन्यप्राणी उपचार केंद्र, गोरेवाडा येथे हलवण्यात आले.

दोन्ही वाघ (मादी) बछड्यांचे वय दोन ते तीन महिने असून यावेळी मादी त्यांच्या बछड्याजवळ आढळून आली नाही. याप्रकरणी वन्यजीव गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपासाची कार्यवाही सुरू आहे.  गेल्या महिन्यातच देवलापार येथेही वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले. तर एक वाघाच्या बछड्याला ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रात हलवण्यात आले. टिपेश्वर अभयारण्यात देखील दोन वाघाचे बछडे एकटेच फिरत असून त्यांच्या आईचा म्हणजेच वाघिणीचा काहीच ठावठिकाणा नाही. त्यामुळे राज्यातील वाघांच्या असुरक्षीततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.गोरेवाडा येथे आणलेल्या वाघाच्या दुसऱ्या बछड्याचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three month old tiger cub dies in lendezari forest area rgc 76 zws