नागपूर : तब्बल २२ ते २३ वर्षांपूर्वी नागपूरपासून अवघ्या काही किलोमीटरवर उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याची घोषणा झाली. त्यावेळी पर्यटकांनी या अभयारण्याची म्हणावी तशी दखल घेतलीच नाही. आता याच अभयारण्यात जाण्यासाठी पर्यटकांच्या रांगा लागतात. ‘एफ-२’ वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांनी पर्यटकांना अक्षरश: वेड लावले आहे. आता तर सकाळच्या कोवळ्या सोनेरी किरणांमध्ये हा कुटूंबकबिला सोन्यात न्हाऊन निघाल्यासारखा दिसतो. वन्यजीव छायाचित्रकार संदीप गुजर यांनी हा क्षण अप्रतिम टिपला आहे.
ज्या ‘एफ-२’ वाघिणीच्या पोटी पाच बछड्यांनी जन्म घेतला, ती ‘एफ-२’ वाघीण ‘फेअरी’ या वाघिणीचेच अपत्य. त्यावेळी ‘फेअरी’ या वाघिणीने देखील पाच बछड्यांना जन्म दिला. तोच वारसा तिच्या या अपत्याने पुढे नेला. ‘फेअरी’ आणि तिच्या पाच बछड्यांपेक्षाही ‘एफ-२’ आणि तिच्या पाच बछड्यांनी सातासमुद्रापार प्रसिद्धी मिळवली.
जन्मल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा त्यांनी त्यांच्या आईसोबत सुरक्षेचा कवच तोडत पाऊल बाहेर टाकले, तेव्हा अक्षरश: पर्यटकांनी या कुटूंबाला घेरले. ते लहान होते तेव्हा त्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत होती. एवढी की पर्यटकांची वाहने थेट त्यांच्याजवळ जाऊन पोहचायची. एकदा तर त्यांनी या कुटूंबाची वाटच अडवली. शेवटी ‘एफ-२’ वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांना त्यांच्याच नैसर्गिक अधिवासात श्वास घेणे कठीण जात आहे हे न्यायालयाला दिसले. त्यावेळी न्यायालयाने यात हस्तक्षेप केला आणि वनखात्यातील अधिकाऱ्यांना पर्यटक वाहन चालकांना आणि पर्यटक मार्गदर्शकाला निलंबित करण्याचा निर्णय घेतला. हे पाचही बछडे आता मोठे झाले आहेत, पण पर्यटकांमध्ये त्यांची “क्रेझ” अजूनही कायम आहे. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला त्यांच्यामुळे सोन्याचे दिवस आले आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरु नये.
नागपूर: उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘एफ-२’ वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांनी पर्यटकांना अक्षरश: वेड लावले आहे. सकाळच्या कोवळ्या सोनेरी किरणांमध्ये हा कुटुंबकबिला सोन्यात न्हाऊन निघाल्यासारखा दिसतो. वन्यजीव छायाचित्रकार संदीप गुजर यांनी हा क्षण अप्रतिम टिपला आहे.… pic.twitter.com/PyJLCmmmIC
— LoksattaLive (@LoksattaLive) November 1, 2025
अभयारण्यातील वाघांचा प्रवास
उमरेड-कऱ्हाडला व्याघ्रप्रकल्पाची ओळख वेगळी सांगायला नकोच. नागझिरा अभयारण्यातून आलेल्या “जय” या वाघाने या अभयारण्याला ओळख मिळवून दिली आणि जगभरातील व्याघ्रप्रेमींची पावले या अभ्यारण्याकडे वळली. अभिनेत्यांपासून तर क्रिकेटपटू अशी सर्वांची मांदियाळी या अभयारण्याने अनुभवली. “जय” च्या जाण्याने हे अभयारण्य ओसाड पडले, पण पुन्हा चांदी, फेअरी या वाघिणीणी या अभयारण्याचे लोप पावत चाललेले वैभव परत आणले. फेअरी या वाघिणीने पाच बछड्यांना जन्म दिला होता. त्यातलीच एक म्हणजे “एफ-२”. तिने देखील पाच बचड्यांना जन्म दिला असून हे कुटुंब उमरेड-कऱ्हाडला अभयारण्यात चांगलीच धमाल करत आहेत.
