नागपूर : वाघांच्या संरक्षण व संवर्धनासाठी व्याघ्रप्रकल्पांची निर्मिती करण्यात आली, पण आता वाघांची संख्या इतकी वाढली की ते या संरक्षित क्षेत्रापुरतेच मर्यादित राहिले नाहीत. तर त्याही पलीकडे जाऊन त्यांनी प्रादेशिक आणि वनविकास महामंडळाच्या जंगलातही आपला अधिवास शोधायला सुरुवात केली आहे. अलीकडेच पेंच व्याघ्रप्रकल्पालगतच्या पवनी वनविकास महामंडळाच्या जंगलात वाघ चक्क तोडलेल्या लाकडांची जणू तपासणी करत असल्यासारखा फिरताना आढळून आला.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यात दोन व्याघ्रप्रकल्प आहेत आणि हे दोन्ही व्याघ्रप्रकल्प ‘पेंच व्याघ्रप्रकल्प’ या नावानेच ओळखले जातात. पेंच नदीच्या काठावर असलेला ‘पेंच व्याघ्र प्रकल्प’ हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर पसरलेला एक प्रसिद्ध ठिकाण आहे, जो वन्यजीव आणि निसर्गप्रेमींसाठी आकर्षक आहे. महाराष्ट्रात, या उद्यानाचे व्यवस्थापन नागपूर जिल्ह्याच्या रामटेक, पारशिवनी आणि सावनेर तालुक्यांमध्ये पसरलेले आहे. या उद्यानात वाघ, बिबट्या, हरीण, आणि विविध प्रजातींचे पक्षी आढळतात. अतिशय घनदाट आणि समृद्ध असलेल्या या जंगलात वाघांची संख्या मोठी आहे. आता ही संख्या वाढत चालली आहे आणि त्यामुळेच वाघ देखील बाहेर पडत आहेत.
ताडोबासारखेच या व्याघ्रप्रकल्पालगतच्या गावांमध्ये वाघ दिसू लागले आहेत. मानव-वन्यजीव संघर्षाची सुरुवात येथेही झाली आहे. मात्र, हा संघर्ष अजूनतरी आटोक्यात आहे. संरक्षित क्षेत्रासह वाघ प्रादेशिक आणि वनविकास महामंडळाच्या जंगलात देखील भ्रमंती करत आहेत. दोन दिवसांपूर्वी वनविकास महामंडळाच्या अखत्यारितील पवनी येथील लाकूड डेपोत वाघ फिरताना आढळून आला. या जंगलात तोडलेली लाकडे आकार, वजन यानुसार मोजून वेगवेगळी ठेवली जातात. याठिकाणी लाकडाची साठवणूक आणि विक्री केली जाते.
पवनी डेपोत या वाघाने मनसोक्त भ्रमंती केली. कधी लाकडांवरुन तर कधी रचून ठेवलेल्या लाकडांच्या मधून तो फिरत होता. जणू या वाघाला वनविकास महामंडळाने तपासणीसाठी पाठवले होते. आता याठिकाणी देखील वाघाचे वास्तव्य आढळल्याने वनविकास महामंडळाची लाकडाच्या संरक्षणाची भीती निघून गेली आहे, अशीही गमतीदार टिपण्णी या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर करण्यात येत आहे.
पवनी येथील लाकूड डेपोत वाघ फिरताना आढळून आला. पवनी डेपोत या वाघाने मनसोक्त भ्रमंती केली. कधी लाकडांवरुन तर कधी रचून ठेवलेल्या लाकडांच्या मधून तो फिरत होता.https://t.co/ZfyIjgKlXt#Pavni #Tiger #pavnidepo #Wildanimal #Wildlife pic.twitter.com/Z1Iz6evlZ2
— LoksattaLive (@LoksattaLive) October 4, 2025
तर कुणी वाघाला तपासणीसाठीच येथे धाडण्यात आल्याचेही म्हटले आहे. हा वाघ नुकताच वयात आलेला असावा आणि अधिवासाचा शोध घेत तो भटकत याठिकाणी आला असावा, असेही काहींचे म्हणणे आहे. मात्र, काहीही असले तरी वाघाच्या या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे आता वनविकास महामंडळालाही व्याघ्रसंवर्धनाकडे लक्ष द्यावे लागणार हे नक्की.