वर्धा: समुद्रपूर, खुरसापार, गिरड परिसरात वाघीण व तिचे तीन बछडे अद्याप मुक्कामास असून गावकऱ्यांचे भय संपता संपत नाही. व्याघ्र कुटुंब सुरक्षित ठेवायचे आहेच आणि गावाकऱ्यांना पण. अशा दुहेरी समस्येत वर्धा वनविभाग आहे. अधून मधून हे तीन शावक नजरेस पडत असल्याचे गावकरी सांगतात. त्यामुळे खरं ते काय पाहण्यासाठी बडे अधिकारी येऊन धडकले.
नागपूर वनवृत्त विभागाच्या वनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांनी व्याघ्र परिवार भटकंती असलेल्या गिरड भागात बुधवारी सायंकाळपर्यंत पाहणी केली. त्यात एक बाब त्यांनी स्पष्ट केली आहे. या परिसरातील गावास लागून असलेल्या जंगल परिसरात झूडपे दाटली आहेत. गावाला लागून लांटेना ही झुडूपी वनस्पती तसेच मोठ्या प्रमाणात रानतुळस वाढल्याचे दिसून आले. या दाटीत वाघ दबा धरून बसण्याची अधिक शक्यता असते. तो नजरेस पडत नाही. मात्र, सावज दिसले की हल्ला चढवितो. हे टाळण्यासाठी हा झुडूपी भाग छाटून टाकण्याची सूचना झाली.
या परिसरात वाघ, बिबट, कळविट, कोल्हे, नीलगाय यांचा प्रामुख्याने वावर आहे. तापत्या उन्हात हे प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे फिरकतात. तसे होवू नये म्हणून कृत्रिम पाणवठे व अन्य जलस्रोत वाढविण्याची सूचना श्रीलक्ष्मी यांनी केल्याचे समजते. दोन दिवसापूर्वीच गावकऱ्यांना वाघिणीचे चाहूल दिसली. खुरसापार, गिरड, पेठ, आर्वी, फरीदपूर, मोहगाव भागात संचार असल्याचे समजते. शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली असून लक्ष ठेवण्यासाठी २४ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे.
वाघीण व तिचे चार शावक यांचा मुक्तसंचार सुरू असतानाच एक पिल्लू रस्त्यावर आल्याने वाहनाच्या धडकेत ते ठार झाले. यामुळे वाघिणीने आपल्या डरकाळ्यांनी परिसर काही काळ हादरवून सोडला होता. आता शांत असून पाळीव जनावरांचा फडशा पाडणे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ऑन दी स्पॉट दौरा करीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना केल्याचे अधिकारी म्हणतात.
वाघीण व तिच्या शावकांना कसलीच इजा पोहचू नये म्हणून जिल्हा वन संरक्षक हरवीर सिंग, सहाय्यक वन संरक्षक अमरसिंग पवार हे सातत्याने लक्ष ठेवून आहेत. वानखत्याचे सर्व कर्मचारी गस्तीवर लागून आहेत. परिसरातील रात्रीचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. वाघीण व तिची तीन पिल्ले हेच सध्या चर्चेत आहे.