नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघिणीचा सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. मात्र, या वाघिणीच्या स्थलांरणावरून पुन्हा अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या वाघिणीला बुधवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास जेरबंद करण्यात आले आणि रात्रीच तिची रवानगी सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या दिशेने करण्यात आली. मात्र, या सर्व प्रक्रियेत अतिशय गुप्तता पाळण्यात आल्याने ते कशासाठी असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

राज्यातील दोन व्याघ्रप्रकल्पांमधील वाघांच्या अंतर्गत स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, या स्थलांतरणाला स्थानिक पर्यटक वाहनचालक, मार्गदर्शक यांनी विरोध केला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून ज्या दोन वाघिणी सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात स्थलांतरीत करण्यात येणार आहेत, त्या गर्भवती असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

केंद्राच्या परवानगीनंतर राज्यातील या पहिल्याच स्थलांतरण प्रक्रियेला आता सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात दोन वाघिणी स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्यासाठी खडसंगी परिसरातील दोन वाघिणींची ओळख पटवण्यात आली. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील खडसंगी परिक्षेत्र बफर पर्यटनात असणाऱ्या ‘चंदा’ आणि ‘चांदणी’ या तीन ते चार वर्षांच्या दोन वाघिणींचे स्थलांतर सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात करण्यात येणार आहे.

मात्र, या दोन्ही वाघिणींचे अलीकडेच ‘बली’ नावाच्या वाघासोबत नैसर्गिक मिलन झाले असून त्या गर्भवती असल्याचा दावा पर्यटक वाहनचालक व मार्गदर्शकांनी केला आहे. त्याचे पुरावे देखील त्यांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत. गर्भावस्थेतील या वाघिणींचे स्थलांतर झाले तर त्यांच्या गर्भाला धोका निर्माण होऊन जिवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याव्यतिरिक्त इतर बघिणीणा सह्याद्रीत पाठवण्याची विनंती त्यांनी केली होती. मात्र, या वनखात्यातील कंत्राटी पशुवैद्यक व शूटर यांनी काल दुपारी साडेचार वाजता “चंदा”  वाघिणीला जेरबंद केले व रात्रीच सह्याद्रीच्या दिशेने रवाना केले.

वाघिणीच्या “प्रेग्नन्सी” चे काय..?

वाघिणीला जेरबंद केल्यानंतर तिच्या “प्रेग्नन्सी” ची तपासणी करण्यात आली नाही. वरिष्ठ  वनाधिकाऱ्यांच्या मते, वाघिणीच्या “प्रेग्नन्सी” ची तपासणी कशी करणार? ती करता येत नाही. पण त्याचवेळी  वनखात्यातील वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते सोनोग्राफी करून त्या वाघिणीची”प्रेग्नन्सी” टेस्ट करता आली असती. शिवाय तिच्या एकूण शारीरिक बदलावरून हे ओळखता येते. त्यामुळे या वाघिणीची “प्रेग्नन्सी टेस्ट” का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

आधी “एअरलिफ्ट”, पण आता “बायरोड”

ताडोबातील या वाघिणीला आधी “एअरलिफ्ट” करून नेण्यात येणार होते, पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे आता “बायरोड” तिची रवानगी करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही ही बाब गुप्त ठेवली. या वाघिणीला लगेच सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात सोडण्यात येणार नाही. तर काही दिवस “सॉफ्ट इंक्लोजर” मध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर तिला कधी सोडायचे याचा निर्णय घेण्यात येईल.