गोंदिया: रस्त्याच्या कडे वरील झाड पुन्हा एकदा वाटसरूंसाठी कर्दनकाळ ठरले. धावत्या मारुती कारवर झाड पडल्यामुळे अपघात घडून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चौघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना , बुधवार ९ जुलै रोजी सकाळी ९ ते ९.३० वाजताच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे कोहमारा-गोंदिया मार्गावरील पेट्रोलपंप परिसरात घडली. वासुदेव खेडकर व आनंदराव राऊत अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.

तीन दिवसांपूर्वी तिरोडा तालुक्यातील सतोना-बोपेसर मार्गावरील झाडावर वीज पडून झाड धावत्या दुचाकीवर कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू तर सोबत असलेला शाळकरी मुलगा जखमी झाल्याची घटना घडल्यानंतर आज बुधवारी पुन्हा रस्त्याच्या कडेवरील झाड कर्दनकाळ ठरले आहे. आज बुधवार सकाळी ९ वाजताच्या सुमारास सडक अर्जुनी शहरात गोंदिया-कोहमारा मार्गावरील पेट्रोलपंप परिसरात कोहमाराच्या दिशेने जात असलेल्या एम.एच. ३१ सीआर १५४९ क्रमांकाच्या मारुती ओमनी कारवर रस्त्याच्या कडेवरील आंब्याचा झाड पावसामुळे कोलमडून पडल्याने मारुती कारमध्ये बसलेले वासुदेव खेडकर व आनंदराव राऊत या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी झाला आहे.

विशेष म्हणजे, कारवर झाड कोसळताच मागून येत असलेल्या टोयोटा कार चालकाचा स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने ती कारही रस्त्याच्या शेजारील दुसऱ्या झाडावर धडकली. ज्यामध्ये त्या कार मधील चालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी या विचित्र अपघाताची माहिती डूग्गीपार पोलिसांना दिली, डूग्गीपार पोलिसांनी घटनास्थळ गाठून बचावकार्याला सुरुवात केली आहे.

दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. बातमी लिहीपर्यंत पोलिस व स्थानिक नागरिकांकडून बचावकार्य सुरू होते तर जखमींना सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करिता पाठवण्यात आलेले आहे. जखमींची नावे सध्या कळू शकली नाही. सडक अर्जुनी तालुक्यातील डूग्गीपार पोलिसांनी प्रकरण दाखल केले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.