नागपूर : वाघ, बिबट शिरणाऱ्या आयुध निर्माणी वसाहतीत चक्क एक नाही तर दोन अस्वलांनी चांगलाच धुमाकूळ घातला. या दोन्ही अस्वलांनी धुमाकूळ घातल्याने वसाहतीतील नागरिकांना कित्येक तास दार बंद करून घरातच कोंडून राहावे लागले. भर दुपारी हा प्रकार घडला. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांना वसाहतीबाहेर काढण्यात यश आले आणि वसाहतीतील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. अलीकडेच महिनाभरापूर्वी अमरावती येथे सुरक्षा दलाच्या इमारतीत चक्क बिबट्याने प्रवेश केला.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली होती. हा बिबट चक्क पायऱ्या चढून वर आला होता. तर नागपूर येथेही शहरातील आयटी पार्क, हिंगणा येथील वसाहतीत चक्क घरामध्ये प्रवेश केल्याच्या घटना घडल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात सातत्याने या घटना घडत आहेत. शहरातील आयुध निर्माणी वसाहतीत नेहमीच वाघ, बिबट्यांचा शिरकाव होतो. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प लागूनच असल्याने नेहमीच या घटना घडत असतात. मात्र, चक्क अस्वलांनी या वसाहतीत मुक्काम ठोकल्याने वसाहतीतील नागरिकांना घराची दारे लावून आतच बसावे लागले. या वसाहतीतील एका इमारतीत दोन अस्वलांच्या पिल्लांनी प्रवेश केला.
दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दोन अस्वलांना पाहून एकच कल्लोळ सुरू झाला. अस्वलाची दोन्ही पिल्ले पहिल्या माळ्यावरील एका सदनिकेत जाण्याच्या तयारीत होते. मात्र, हे लक्षात येताच त्याठिकाणी राहणाऱ्या कुटुंबाने घराची दारे बंद केली आणि पुढील अनर्थ टळला. मात्र, हे अस्वल वसाहतीतून बाहेर पडण्यास तयार नव्हते. सतत पायऱ्यांवरुन खाली-वर त्यांची ये-जा सुरू होती. हे कळताच त्याठिकाणी एकच गर्दी झाली.
वाघ,बिबट शिरणाऱ्या नागपूरातील आयुध निर्माणी वसाहतीत चक्क एक नाही तर दोन अस्वलांनी चांगलाच धुमाकूळ घातला. या अस्वलांमुळे वसाहतीतील नागरिकांना काही तास दार बंद करून घरातच कोंडून राहावे लागले. भर दुपारी हा प्रकार घडला. वनखात्याचे कर्मचारी याठिकाणी आले आणि त्यांनी त्या दोन्ही… pic.twitter.com/vLvUZqcbO5
— LoksattaLive (@LoksattaLive) July 25, 2025
नागरिकांनी त्या अस्वलांना इमारतीतून बाहेर काढण्याचा बराच वेळ प्रयत्न केला. मात्र, ते दोन्ही अस्वल त्याचठिकाणी घुटमळत होते. वाघाच्या तावडीत सापडल्यानंतर सुटकेची शक्यता कमीच असते. तसेच अस्वलाच्या बाबतीतही असते. अस्वलाने एकदा हल्ला केला, तर वाचण्याची शक्यता फारच कमी असते. त्यातूनही जीव वाचला, तर हल्ल्यातून झालेल्या जखमा कायम लक्षात राहील, अशा असतात. त्यामुळे याठिकाणी वनखात्याला ही माहिती देण्यात आली. वनखात्याचे कर्मचारी याठिकाणी आले आणि त्यांनी त्या दोन्ही अस्वलांना इमारतीतून बाहेर काढले. त्यानंतर दोन्ही अस्वलांना जंगलाच्या दिशेने पिटाळण्यात यश आल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. सुदैवाने अस्वलांनी कोणालाही इजा पोहोचविली नाही. भर दूपारी आयुध निर्माणी वसाहतीत हा थरार चालला.