निवडणुकीच्या तोंडावर एकाची तुरुंगात रवानगी
नागपूर : भाजपचे विदर्भातील दोन आमदार वेगवेगळ्या कारणांसाठी वादात सापडले आहेत. एकाने महिला पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केली तर दुसऱ्याची वादग्रस्त चित्रफीत समाजमाध्यावर पसरली आहे.
भंडारा जिल्ह्य़ातील तुमसर-मोहाडीचे भाजपचे आमदार चरण वाघमारे आणि गोंदिया जिल्ह्य़ातील आमगाव-देवरीचे भाजपचे आमदार संजय पुराम अशी या आमदारांची नावे आहेत. त्यांच्या कृत्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपची कोंडी झाली आहे. तर विरोधकांनी भाजपला लक्ष्य करीत भाजपची विचारधाराच मुळी महिलांना दुय्यम वागणूक देण्याची असून, या निमित्ताने भाजपचा खरा चेहरा समोर आला, अशी परखड टीका केली आहे.
आमदार चरण वाघमारे यांच्यावर महिला पोलीस उपनिरीक्षकाचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. वाघमारे यांनी चौकशीची मागणी केली होती. चौकशीत गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात भाजपचे शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अनिल जिभकाटे यांनी महिला अधिकाऱ्याचा हात पकडून धक्काही दिल्याची तक्रार आहे.
आमदार संजय पुराम हे एका डान्स बारमध्ये महिलेसोबत नाचतानाची चित्रफीत समाजमाध्यमांवर पसरली आहे. मात्र, पुराम यांनी पोलिसात तक्रार करून आपण त्या चित्रफितीमधील व्यक्ती नसल्याचे म्हटले आहे. चित्रफितीत फेरफार केला असून, हा खोडसाळपणा निवडणुकीच्या तोंडावर करून बदनाम करण्यात येत आहे. संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुराम यांनी पोलीस तक्रारीत केली आहे.
आमदार वाघमारे यांनी जामीन घेण्यास नकार दिला आहे. त्यांचे आणि महिला अधिकारी यांचे काय बोलणे झाले याची कल्पना नाही. यासंदर्भात योग्य निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ घेईल. तर आमदार पुराम यांनी ती बनावट चित्रफीत असल्याचे म्हटले आहे. एका चांगल्या आदिवासी आमदाराला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे.
– गिरीष व्यास, आमदार भाजपचे प्रवक्ते
या प्रकरणामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अशी जाहिरात करतात आणि त्यांच्या पक्षाचे आमदार, पदाधिकारी महिलांचा अपमान करतात.
– नाना पटोले, काँग्रेस किसान आघाडीचे अध्यक्ष