यवतमाळ : बाभूळगाव तालुक्यातील एरंडगाव आणि वडगाव येथील अनुक्रमे राजेंद्र वानखडे आणि संजय गावंडे या सावकारग्रस्त शेतकऱ्यांची अवैध सावकारीत हडपलेली जमीन जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशाने गुरुवारी या शेतकऱ्यांना ताब्यात दिली गेली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यवतमाळ जिल्ह्यात अवैध सावकारांनी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अवैध सावकारीचे माध्यमातून खरेदी करून घेतल्याची प्रकरणे आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या सावकारग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाव्यात म्हणून नव्या कायद्यासाठी संघर्ष केला. त्यातून निर्माण झालेल्या नव्या सावकारी अधिनियमाची माहिती शेतकऱ्यांना देऊन सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रारी दाखल करण्याबाबत मार्गदर्शन केले.

हेही वाचा – गोंदिया : ३० जूनपूर्वी शाळा सुरू केल्यास कारवाई, खासगी शाळांना शिक्षण विभागाची ताकीद

या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आ. विद्या चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या आणि सावकारग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आता अशा प्रकरणांचा निकाल लागत असून जिल्हाभरातील अनेक शेतकऱ्यांना सावकारी पाशात गेलेली त्यांची हक्काची जमीन परत मिळण्याचा मार्ग मोकळा होतो आहे.

अवैध सावकारीमध्ये जमीन गमावल्यामुळे गेल्या २० वर्षांपासून न्यायासाठी झगडणाऱ्या राजेंद्र वानखडे आणि संजय गावंडे यांना यंदा खरिपाच्या तोंडावर त्यांची हक्काची जमीन परत मिळाली. शेताचा ताबा देण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष शेतावर जाऊन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या आदेशानुसार बाभूळगाव येथील सहायक निबंधक व्ही. व्ही. रणमले, मंडळ अधिकारी जडेकर, तलाठी भेंडारकर, ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था सचिव प्रशांत येंडे, पोलीस विभागाकडून पोलीस जमादार शिंदे, आदींच्या उपस्थितीत पार पडली.

हेही वाचा – ‘एमपीएससी’कडून अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर, प्रतीक आगवणे राज्यातून पहिला

यावेळी संबंधित सावकार बाई आणि तिच्या हस्तकाने प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, मात्र सहाय्यक निबंधक आणि पोलिसांनी समज दिल्याने ते घटनास्थळावरून चालते झाले. या प्रसंगी सावकारग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. घनश्याम दरणे प्रामुख्याने उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two farmers of yavatmal district got back their land that was usurped by moneylenders nrp 78 ssb