अकोला : जीवनात ताण-तणाव वाढत चालला आहे. सातत्याने वाढत चालल्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांवर पालकांच्या अपेक्षांचे मोठे ओझे असते. अपेक्षा पूर्ण न झाल्यास हताश होऊन विद्यार्थी टोकाचे पाऊल देखील उचलतात.याच प्रकारच्या दोन धक्कादायक घटना अकोला शहरातून समोर आल्या आहेत. भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी तणावातून आपले जीवन संपवले.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या मागील कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, अभ्यासाच्या तणावातूनच या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. विविध कारणांवरून सर्वसामान्यांच्या जीवनात तणावाची परिस्थिती निर्माण होत असते.
प्रत्येकाला कौटुंबिक पातळीवर विविध अडीअडचणींचा सामना करावा लागतो. यातून जीवनात नैराश्य पसरते. नैराश्य व तणाव यावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्यास आत्महत्येसारखे पाऊल उचलण्याचे प्रमाण वाढत चालले. प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धा, अभ्यास, वैयक्तिक नातेसंबंधांतील गुंता यातून तणाव वाढत जातो. ज्या वेळी एखाद्या व्यक्तीला त्याचे जीवन निरर्थक व नीरस वाटते, तेव्हा नैसर्गिकरित्या त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात.
अशा वेळी जर त्याला योग्य असे मानसिक पाठबळ मिळाले नाही तर तो स्वतःला संपवायचा प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासावरून प्रचंड स्पर्धा वाढली आहे. त्यातच पालकांच्या अपेक्षांचे ओझे विद्यार्थ्यांसाठी डोईजड ठरते. त्यामुळे आलेल्या तणावातून विद्यार्थी आपले जीवन संपवण्यास देखील मागेपुढे पाहत नाहीत.
दरम्यान, अकोला शहरात नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केली. दोघांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत. शहरातील खासगी शिकवणी वर्गामध्ये नीट अभ्यासक्रमाची तयारी व सराव करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
१७ वर्षीय पार्थ गणेश नेमाडे आणि १८ वर्षीय अर्णव नागेश देबाजे अशी आत्महत्या करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत. पार्थ नेमाडे हा तेल्हारा तालूक्यातील रायखेड येथील रहिवासी असून तो अकोल्यातील एका शिकवणी वर्गात शिक्षण घेत होता. अर्णव देबाजे हा अकोल्यातल्या मोठी उमरी भागातील रहिवासी होता. दोघेही विद्यार्थी नीट अभ्यासक्रमाची तयारी करून सराव करीत होते. या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. विद्यार्थ्यांमधील तणावाचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे.