चंद्रपूर : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात दोन वाघ जेरबंद करण्यात आले आहेत. भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडूनच्या कार्यक्रमांतर्गत या दोन्ही वाघांना वैद्यकीय तपासणीनंतर नवेगाव-नागझिरा अभयारण्यात सोडण्यात येणार आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या संख्येने वाघ आहेत. अभ्यासकांच्या मते वाघांची वाढती संख्या मानव-वन्यजीव संघर्षाचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सहा वाघ नवेगाव-नागझिरा अभयारण्य तसेच जिथे वाघांची संख्या कमी आहे, अशा अभयारण्यात सोडण्याचा कार्यक्रम भारतीय वन्यजीव संस्था तथा वनविभागाने तयार केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा कार्यक्रम प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येकी एक अशा दोन वाघांना जेरबंद करण्यात आले. ताडोबा प्रकल्पाचे संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीच्या जंगलातील तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील शिवणी-करवा वनपरिक्षेत्रतील दोन वाघ जेरबंद करण्यात आले आहेत. यातील शिवणी-करवा जंगलातील वाघ चंद्रपूर येथेच जेरबंद आहे. भारतीय वन्यजीव संस्थाचे अभ्यासक तथा पशुवैद्यकीय अधिकारी या दोन्ही वाघांची वैद्यकीय तपासणी करतील. वाघांची प्रकृती उत्तम असल्याची खातरजमा केल्यानंतर भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडूनचे अधिकारी वाघांना नागझिरा अभयारण्यात सोडण्याचा निर्णय घेतील. वाघ स्थलांतरणचा संपूर्ण कार्यक्रम भारतीय वन्यजीव संस्था राबवित आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात हा संपूर्ण प्रोजेक्ट सुरू असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व त्यांच्या पथकांनी अथक परिश्रम घेत या वाघांना जेरबंद केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two tigers caught up in chandrapur gadchiroli district rsj 74 ysh